top of page
  • Writer's pictureProf. Kshitij Patukale

माणूस हा केवळ करमणूकीसाठी जन्माला आलेला प्राणी आहे का ?


करमणूक, करमणूक आणि फक्त करमणूक...! तिन्ही त्रिकाळ 24 x 7 होल इयर, सदासर्वकाळ फक्त करमणूक सुरू आहे. मनोरंजन हे करमणूकीचे दुसरे नाव आहे. मन + रंजन अशी मनोरंजन शब्दाची फोड आहे. मनाचे रंजन करणे असा त्याचा सरळ सोपा अर्थ आहे. खूप काम करून, खूप थकून भागून, दमून गेल्यावर मनाला आलेली मरगळ दूर करायचे साधन म्हणजे मनोरंजन. एखादी दु:खद घटना घडली असेल, खूप निराशा आली असेल अशावेळी नकारात्मक विचारांमधून बाहेर पडायचे साधन म्हणजे मनोरंजन हे होय. मनाला ताजे करण्याचे, मनाला उल्हसित करण्याचे साधन म्हणजे मनोरंजन. मना बरोबरच बुद्धीला आनंद देणारे, तजेला मिळवून देणारे, सारे काही विसरायला लावणारे साधन म्हणजे मनोरंजन. करमणूक आणि मनोरंजन हा कोणे एके काळी विरंगुळ्याचा, निवांतपणाचा विषय होता. शंभंर दीडशे वर्षापूर्वी माणसांची जीवनपद्धती आणि दिनचर्या खुपशी निसर्ग स्नेही होती. यांत्रिकीकरणाने आणि विज्ञानाने जीवनावर अमानुष आक्रमण केलेले नव्हते. जीवनाचे रहाट गाडगे संथ गतीने सुरु होते. माणसांची जीवनशैली निसर्ग स्नेही आणि निसर्गावर अवलंबून होती. त्यावेळच्या जीवनपद्धतीमध्ये शारिरीक श्रमांचा फार मोठा वाटा होता. घरामध्ये रोजच्या जेवणासाठी माता भगिनींनी दोन चार तास जात्यावर पीठ दळावे लागत असे. पाणी आणण्यापासून संपूर्ण घरकाम करतांना कंबरडे मोडत असे. पुरूषांची स्थितीही फारशी वेगळी नव्हती. ९० टक्केहून अधिक लोक शेती आणि शारिरीक श्रमांशी निगडीत व्यवसायांमध्ये काम करीत होते. त्यामुळे दिवसाचा बरासचा भाग हा कष्ट करण्यात जात असे. सतत कामात रहावे लागत असे. शरीरातून घाम गळत असे. वीज नव्हती. यंत्रे नव्हती. दिनचर्या निसर्गा नियमांनी बांधलेली होती. निसर्गाच्या घड्याळ्याप्रमाणे माणसाचे जीवन चालत होते. जैविक घड्याळ्यासारखे माणसाचे जीवनही जैविक होते. रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ( म्हणजे पहाटे ३ ते ५ हा कलावधी ) उठावे. सडा संमर्जन करावे. सुर्य दर्शन होण्यापूर्वीच सर्व आन्हिके वगैरे उरकून घ्यायची. सातच्या सुमारास भरपूर नाष्टा करायचा आणि घराबाहेर पडायचे. दिवसभर राबराब राबून संध्याकाळी दिवेलागणीला म्हणजे सुर्यास्त झाल्यावर घरी परतायचे. सगळ्यांची ख्याली खुशाली झाल्यावर आणि जेवणखाण झाल्यावर मग वडाच्या पारावर जमायचे. गप्पागोष्ठी करायच्या. इकडच्या तिकडच्या बातम्य़ा चघळायच्या. झालच तर मंदिरात भजनाला जायच. अगदीच बेरकी असला तर कुठे नाचगाण्याला, तमाशाला जायच. रात्री नऊ दहाच्या आधीच माणस गपगार होऊन निद्रेच्या अधीन होत असत. मनोरंजन आणि करमणूक हे विषय अगदी विशेष होते. गावाची जत्रा किंवा यात्रा असली किंवा प्रवचन किर्तन असेल तेव्हा तिथे जावून आनंद घेणे हा करमूकीचा भाग होता. साहित्य, कला, संगित यांचाही जीवनामध्ये सहभाग होता. पण तो तोंडी लावण्यापुरता होता. करमणूक आणि मनोरंजन हे सर्व प्रकारच्या व्यापातून, श्रमातून मोकळे झाल्यावर घटकाभराचे तुणतुणे होते. करमणूक ही माणसाची मुलभूत गरज नव्हती तर ती पुरवणी गरज होती. खरतर करमणूक आणि मनोरंजनाच्या साधनांना समाजात दुय्यम स्थान होते किंवा समाज मान्यता नव्हती. कुणी तमाशाला जाते, नाटक पाहते म्हणजे कमीपणाचे असे मानले जात होते. करमणूकीबाबत अगदीच दु:स्वास नव्हता. पण त्याची फारशी चर्चा होत नसे. किंवा ते समाज जीवनाचे एक सुप्त अंग होते. ते समाजाबरोबरच बोट धरुन चालत होते. त्याचा वेग फारसा नव्हता किंवा त्याचा समाजावर अभुतपूर्व असा मारा होत नव्हता.


काळाच्या ओघात माणसाचे अवघे जीवन बदलून गेले आहे. गेल्या दीड दोनशे वर्षांमध्ये मानवी जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये आणि दैनंदिन दिनचर्येमध्ये उलथापालथ झाली आहे. यांत्रिकीकरण आणि उर्जांचे स्तोत्र आणि विज्ञान यांनी संपूर्ण जीवन एका बाजूला अत्यंत विकसित आणि भक्कम केले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पूर्णत: उध्वस्त केले आहे. आजची परिस्थिती पाहिली तर एखाद्या परग्रहावरून आलेल्या प्राण्याची खात्री पटेल की पृथ्वीवर जन्माला आलेला माणूस नावाचा प्राणी हा फक्त आणि फक्त करमणूक करून घ्यायला जन्माला आलेला प्राणी आहे. जन्मल्यापासून मरे पर्यंत सतत, निरंतर आणि विविध प्रकारांनी तो स्वत:ची करमणूक करुन घेताना दिसतो आहे. मनोरंजनाचा मूळचा उद्देश आता पूर्णपणे बाजूला झाला आहे. आता त्याला क्षणभराचीही उसंत दिली जात नाही. त्याने सतत स्वत:ची करमणूक करुन घेतलीच पाहिजे असा सर्वांनी निश्चय केला आहे आणि तोही बिचारा सतत करमणूक करुन घेण्यातच मग्न झालेला आहे. असे का घडले आहे ? अशी परिस्थिती आज का उद्भवली आहे ? याचे मूलभूत कारण काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. मुळात माणूस म्हणून मी का जन्माला आलो आहे ? हे मानवी शरीर, मानवी देह मला जणू जन्मांतरीच्या पुण्य कार्यामुळे, सत्कृत्यांमुळे मिळालेला आहे, ही जाणीव पूर्णत: लोप पवली आहे. शरीर आणि मन थकल्यानंतर थोडेफार आवश्यक असणारे मनोरंजन आता माणसाची मूलभूत गरज बनले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. आता मनोरंजन आणि करमणूक ही देखिल एक मूलभूत गरज बनली आहे. उलटपक्षी अन्न नसले तरी चालेल, वस्त्र नसले तरी चालेल, निवारा नसला तरी चालेल. पण माणसाची मुख्य आणि मूलभूत गरज करमणूक हीच बनली आहे. पूर्वी करमणूक ही “ मन: प्रशमनो उपाय ” म्हणजे मन प्रसन्न करण्याचे साधन होते. आता ती जिवंत राहण्यासाठीची अत्यावश्यक गरज बनली आहे. माणसे जगतात एकाच कारणासाठी, कारण की ती मरत नाहीत. जिवंत असल्यावर करायचे काय ? आणि उद्योग कोणता ? तर तो सतत करमणूक करून घेण्याचा उद्योग आहे. आजचा माणूस जिवंत राहतो तो फक्त करमणूक करुन घेण्यासाठी अशी परिस्थिती आहे. याचे खरे कारण म्हणजे जगणे ही एक मोठी समस्या बनली आहे. प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जिवंत राहण्याची सक्ती आहे. सगळेच जण काही आत्महत्या करण्याइतके शूर किंवा नेभळट नसतात आणि इतरांना संपविणेही तितकेसे सोपे नसते. आज ही जी जगण्याची सक्ती आहे म्हणून करमणूकीची चलती आहे. विना उद्देश, कोणतेही ध्येय डोळ्यासमोर न ठेवता फक्त जगत रहायचे अशी आजची प्रमुख समस्या आहे. सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात येते की आपण जिवंत आहोत. आजचा दिवस उजाडला आहे. मग प्रात:र्विधी, चहा, नाष्टा, पेपर वाचन होते. काही कामधाम नसले तर लोळत रहायचे. टिव्ही चॅनेल्स, इंटरनेट किंवा मोबाईलला चिकटून बसायचे. काम असले तर कामावर जायचे. आजचा दिवस ढकलायचा. मिळेल तेवढे मिळेल तिथे खायचे, प्यायचे, ओरबाडायचे आणि रात्र झाल्यावर झोपायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि लक्षात येते, “अरेच्चा, आपण जिवंत आहोत की..” पुन्हा मारून मुटकून जगत रहायचे. अशी आज माणसाची अवस्था झाली आहे. टाईमपास ही आजच्या जगातील सर्वांत गंभीर समस्या आहे. टाईमपास कसा करायचा ? जिवंत असतानाचा वेळ कसा घालवायचा ? वेळ घालवायला काहीतरी साधन पाहिजे म्हणून त्याच्यावर सतत करमणूकीच्या साधनांचा वर्षाव केला जातो. दूरदर्शनचे चॅनेल्स, इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यांनी प्रत्येक माणसाला पक़्के जखडून टाकले आहे. माणसांना करमणूकीच्या साधनांनी अक्षरश: कैद केलेले आहे. मनोरंजनाच्या विळख्यामध्ये त्याला घट्ट पकडले आहे आणि त्याच्या भोवतीचा फास करकचून आवळला जात आहे.


असे कसे झाले ? माणसाची अशी अवस्था का झाली हा खरतर संशोधनाचा आणि सखोल अभ्यासाचा विषय आहे. आजचा अत्यंत प्रगत, विकसित आणि अती श्रीमंत माणूस हा परावलंबी बांडगूळासारखा जीवन का जगत आहे बर ? अनेकदा वाटतं की जर ब्रह्मांडामध्ये काही अपघात आणि स्फोट झाले आणि माणसाने पाठवलेले उपग्रह नष्ट झाले तर पृथ्वीवरील सर्व नेटवर्क धाडकन बंद पडेल. सगळ्या नेटवर्कींगच्या यंत्रणा ठप्प होतील. दूरदर्शन, इंटरनेट सर्व बंद पडेल. असे जर घडले तर चोवीस तास चालणारी करमणूक यंत्रणा बंद पडल्याचा धसका घेवून आणि हाय खावून करोडो लोक मरण पावतील आणि पृथ्वीवरील माणसांचे ओझे क्षणात कमी होईल. करमणूकीच्या साधनांचे एका नशेमध्ये रुंपातर झालेले आहे. जशी तंबाखू, सिगारेट, बीडी, दारू, अंमली पदार्थ यांची नशा असते अगदी तशीच करमणूकीच्या साधनांची नशा प्रत्येकाला चढली आहे. काही काळ जरी लाईट गेला, इंटरनेट बंद पडले तर माणसे कावरीबावरी आणि वेडीपिशी होतात. काय करावे आणि काय करु नये अशी त्यांची तारांबळ उडते. खावू का गिळू अशी अवस्था होते. माणसाचे रुपांतर अक्षरश: पशूमध्ये होते आणि तो सर्वांगाने अस्वस्थ होवून आजूबाजूच्या सर्वांवर गुरगुरायला लागतो. साधा जनरेटर सुरु होईपर्यंत माणसांना दम निघत नाही. ही अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना आजच्या जगाचे आणि आजच्या पिढीचे व्ययछेदक लक्षण बनले आहे. आणखी वाईट गोष्ट म्हणजे हे सगळे पाहताना आपण सर्व जणू पूर्णत: हताश आणि असहाय्य बनलो आहोत. आपण काहीही करु शकत नाही आणि आपल्याला काहीही करता येत नाही, अशी हतबलतेची भावना संपूर्ण विश्वामध्ये जोर धरत आहे.


मनोरंजन आणि करमणूक ही सुरुवातीच्या काळामध्ये एक उदात्त अशी सोज्ज्वळ भावना होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असताना संपूर्ण जगामध्ये समाजावर सुसंस्कार करणारी, समाजमनाला दिशा देणारी, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेली साधने म्हणून करमणूकीच्या साधनांकडे पहिले जात होते. अगदी चित्रपट किंवा दूरदर्शनच्या अगदी सुरुवातीच्या काळातील वर्णने पहा. सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक आशयघन असणारे चित्रपट होते. घटकाभर नि:खळ करमणूक आणि जाता जाता संदेश देणे असे त्याचे स्वरुप होते. दूरदर्शनचा उपयोग बातम्या, माहितीचे वहन आणि स्टॅन्डर्ड करमणूक असे होते. घरातील सर्व लोक एकत्रितरित्या दूरदर्शन आणि रेडिओवरील कार्यक्रमांचा आनंद घेत होते. साहित्य, कला, विनोद, अभिव्यक्ती यांचा दर्जा अतिशय उच्च होता. नूतनसारखी अभिनेत्री म्हणजे सोज्वळ आणि आदर्श स्त्रीचा जणू वस्तूपाठ होता. करमणूकीच्या साधनांमध्ये आदर्श जीवनाचे आणि संस्कारांचे स्त्रोत होते. हळूहळू त्याचे बाजारामध्ये रुपांतरण होवू लागले. त्याचे स्वरुप हिणकस होवू लागले. त्याचा दर्जा रसातळाला जाताना आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. पूर्वी चित्रपटात एका पक्षाने पक्षीणीच्या चोचीला स्पर्श केला तरी माणसांना लाज वाटायची. आता कशात काय घातले तरी माणसे विनासंकोच विनासंवेदना ते सगळं भुतासारख पहात राहतात. असं वाटतं की सगळ्या संवेदना, सगळे मांगल्य, सगळे संस्कार, सगळे उत्तम आचार, विचार कापरासारखे उडून गेले आहेत. माणसे बधीर झाली आहेत. सामाजिक मन रोगट झाले आहे. कपिल शर्मा सारख्यांचे शो पाहून त्यातील अत्यंत हीन हावभाव, अंगविक्षेप, नवज्योत सिद्धूचे भयंकर हसणे पाहून असे वाटते की सऱ्यांना जणू गोळ्या घालाव्यात किंवा स्वत:ला तरी गोळ्या घालून घ्याव्यात ! रिअ‍ॅलिटी शो, जाहिराती, वेगवेगळ्या मालिका यांच्यातील अत्यंत सुमार दर्जाची कला आणि साहित्य पाहिल्यावर खरच हसावं की रडावं ते कळत नाही. रेडिओच्या चॅनेलवरील भाषांची, शब्दांची आणि साहित्यांची राक्षसी तोडफोड पाहून मन उद्विग्न होते. खरी भीषण परिस्थिती तर पुढेच आहे. हे सगळे नतद्रष्ट चाळे पाहून पोट धरुन हसणारी आणि उल्हसित होणारी आजची पिढी आणि माणसे पाहिल्यावर मात्र प्रचंड निराशा होते. त्यांच्या अभिरूचीच्या अत्यंत हीन पातळीला पाहून त्यांची दया येते. खरे सात्त्विक, उर्जा युक्त, जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असे अन्न त्यांनी खाल्लेले नाही, पाहिलेले नाही, त्यांना त्याची माहितीच नाही. पाव, बिस्किटे, पिझ्झा, पेप्सी आणि कोकवर पोसलेली आणि अत्यंत नाटकी, बाष्कळ पाश्चात्य स्टाईलने जगणारी आजची पिढी पाहिली की मनाचा थरकाप उडतो.


आजच्या या अशा परिस्थितीची कारणे कोणती यांचा निर्धाराने आणि निश्चयाने शोध घेतला पाहिजे. यासाऱ्या मागे आर्थिक विकास आणि चंगळवादी जीवनशैली यांचा प्रामुख्याने हात आहे. मात्र त्यापेक्षाही आर्थिक असमानता आणि बेरोजगारी हे प्रमुख कारण आहे. भांडवलवाद, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मूठभर लोकांच्या हाती सत्ता आणि संपत्ती एकवटली आहे. अगदी अमेरिकेतही लोकसंख्येच्या २ % लोकांकडे ४६ % संपत्ती आणि बाकीच्या ९८ % लोकांकडे उरलेली ५४% संपत्ती अशी स्थिती आहे. यांत्रिकीकरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी माणसाची आणि मानवी श्रमांची गरज संपवून टाकली आहे. या मूठभर लोकांनी ऑटोमायझेशेन आणि रोबोटोझायजेशन या सारख्या गोंडस शब्दांनी मानवी श्रमांच्या – कष्टांच्या - रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या आहेत आणि ते आपल्या संपत्तीमध्ये – नफ्यामध्ये सतत महाभयंकर वाढ करीत आहेत. दुसरीकडे जिवंत असलेल्या माणसांनी आपल्याला फार त्रास देवू नये म्हणून त्यांना करमणूकीच्या, मनोरंजनाच्या आणि अराजकतेच्या जंजाळामध्ये सतत गुंतवून ठेवले आहे. त्यांना करमणूकीची नशा लावली आहे आणि स्वत:कडे कोडगेपणाने संपत्ती ओढत आणि ओरबाडत राहिले आहेत. ही पृथ्वी सोडून जाताना काहीही बरोबर घेवून जाता येत नाही हे माहित असूनही हा हैदोस सुरू आहे. लोकसंख्या, दहशतवाद, पर्यावरण, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास, शहरीकरण, वाढते आयुर्मान, वैद्यकिय सुविधा इ. अनेक कारणे आजच्या या परिस्थितीमागे आहेत. एक मात्र नक्की माणूस आता अधिकाधिक एकटा बनत चालला आहे. आतून तुटत चालला आहे. परावलंबी बनत चालला आहे. जगण्यातील आत्मविश्वास त्याने गमावला आहे. जसे डोंबाऱ्याचे खेळ चालतात किंवा गारूडी सापांना खेळवतो किंवा सर्कसमध्ये जंगली प्राण्यांना खेळवले जाते अगदी तसेच करमणूकीची आणि मनोरंजनाची साधने माणसांना खेळवत आहेत. त्याच्यातील नैसर्गिक क्षमतांना मारून टाकीत आहेत. शरीरातून घाम येतो हे माणसे विसरून गेली आहेत. घाम गाळायला आता जिम लावावी लागते. फक्त पुरूषांनाच नव्हे तर महिलांनाही आता जिम गाठावी लागते. कोणतेही शारिरीक श्रम करावे लागत नसल्याने मनोवैज्ञानिक रोगांनी शरिराला पोखरून टाकले आहे. वैद्यकिय यंत्रणांचा तर फार मोठा बाजारच झालेला आहे. वैद्यकिय प्रगती हा खरतर एका जीवघेण्या करमणूकीचा विषय बनलेला आहे.


करमणुक आणि मनोरंजनाने केलेला सर्वात भीषण परिणाम म्हणजे माणसाची विचार शक्तीच त्याने नष्ट करून टाकली आहे. विचार करण्याची प्रक्रियाच तुटून पडली आहे. माणसे मोठ्या अभिमानाने सांगतात की डोक्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. खायचे, प्यायचे आणि मजा करायची… फक्त मजा… काय समजलात… फक्त मजा ! आपल्या सभोवती काय चालले आहे त्याचा अंदाज घेणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याचे पृथक्करण करणे आणि त्यातून मांगल्यपूर्ण आनंददायी जीवन जगणे या माणसाच्या क्षमता नष्ट झाल्या आहेत. तो एका भ्रमिष्ठ आणि वेड्यासारखा आजूबाजूला पहात असहाय्यपणे आणि अगतिकपणे जीवन जगत आहे. त्याच्यावर होणाऱ्या करमणूकीच्या अतिरेकी माऱ्यामुळे तो संवेदनाहीन आणि केविलवाणा झाला आहे. माणुस हा फक्त एक करमणूक करून घ्यायला जन्माला आलेला प्राणी आहे असे आजचे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था या साऱ्यांचे मत बनले आहे. त्यांची समाजपयोगी उपक्रम पाहिले की याची खात्री होते. कारण त्यात मनोरंजन करणाऱ्या कार्यक्रमांचीच यादी असते. समाजची करमणूक करून आपण त्यांना अधिकाधिक गूंगवून ठेवण्याचे आणि बधीर करण्याचेच काम करीत आहोत याचे त्यांना भान नसते. माणसाची सतत करमणूक करायची असाच त्यांचा निश्चय असतो. त्यासाठी कितीही हीन पातळीवर गेले तरी चालेल. पण करमणूकीमध्ये खंड पडता कामा नये. निमित्त कूठलेही असो… गणेशोत्सव असो किंवा दहिहंडी, नवरात्र असो किंवा कोजागिरी, लग्न समारंभ असो किंवा मुंजीचा कार्यक्रम, बारसे असो किंवा बारावे… माणसांनी सतत करमणूकीच्या साधनांना लटकून राहिले पाहिजे. स्मार्ट फोनने तर आता मोठी क्रांती केली आहे. पूर्वी संपूर्ण गावामध्ये एक टिव्ही सेट होता. नंतर एका गल्लीत एक सेट, एका वाड्यात एक सेट, एका घरात एक टिव्ही आणि शेवटी प्रत्येक खोलित एक टिव्ही सेट अशी प्रगती होत गेली. आता मात्र स्मार्ट फोनमुळे प्रत्येकाच्या हातात चोवीस तास टिव्ही आणि थिएटर झाले आहे. प्रसंग कुठलाही असो, दिवसाचा कुठलाही भाग असो, माणसे सतत स्मार्ट फोनरूपी यंत्राला चिकटलेली आणि लोंबकळत असलेली दिसतात. अत्यंत प्रगत, आधुनिक आणि विकसित अशा या माणसाला सलाम आणि त्याला सतत करमणूकबद्ध ठेवणाऱ्या यंत्रणेला सलाम… मनोरंजनाच्या या महामार्गावर आधुनिक माणसाने असेच सुसाट जगत रहावे, करमणूकीच्या मेट्रोमध्ये बसून व्यक्तीस्वातंत्र्याच्या एक्सप्रेसवेवर बुलेट ट्रेनच्या वेगाने घोडदौड करावी. आधिच सैराट झालेल्या समाजमनाला अधिकाधिक मोकाट बनवावे आणि पिसाट करून सोडावे एवढे एकच मागणे आता मागायचे उरले आहे.

560 views0 comments

Comentarios


bottom of page