top of page
  • Writer's pictureProf. Kshitij Patukale

थोडे गवसले... बरेचसे हरवले ! ९० वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ डोंबिवली

मराठी साहित्य विश्वातील दरवर्षी साजरा होणारा एक अनोखा सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. भारतामध्ये फक्त मराठी भाषेमध्ये असा भव्य दिव्य साहित्य सोहळा आणि तोही दरवर्षी साजरा केला जातो. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ दरम्यान डोंबिवली येथे ९० वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले गेले होते. आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली आगरी युथ फोरम, डोंबिवली या संस्थेने हे संमेलन आयोजित केले होते. अतिशय दिमाखदार आणि थाटामाटात हे संमेलन साजरे झाले. या संमेलनामध्ये संपूर्ण काळ उपस्थित राहून त्याचा आढावा घेता आला. या संमेलना मधून थोडे गवसले आणि बरेचसे हरवले असा निष्कर्ष काढावा लागतो. खरतर या संमेलनाच्या आयोजनापासूनच अनेक खडतर आव्हाने समोर उभी ठाकली होती. यावर्षी महामंडळाचे फिरते कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे होते. त्यानुसार डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाल्या नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली होणारे हे पहिलेच संमेलन होते. साहित्य संमेलनाचे भपकेबाज स्वरुप आणि त्याची ऐश्वर्यशाली संहिता बदलण्यासाठी आग्रही असणारे डॉ. जोशी हे संमेलन जाहिर झाल्यापासूनच चर्चेत होते. संमेलने साधेपणाने साजरी व्हावीत, त्यातील संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन नाहीसे व्हावे. साहित्यिकांनी मानधना पलिकडे जावून साहित्या संबंधी काटेकोर भूमिका मांडावी, संमेलनाची दिशा बहुजनांकडे वळवावी अशी आग्रही मते त्यांनी सातत्याने मांडली होती. त्याचा प्रत्यय संमेलनामध्ये जाणवला. एका अर्थाने प्रगतीशील आणि नविन पायंडा पाडणारे संमेलन म्हणून डोंबिवली येथिल साहित्य संमेलनाचा उल्लेख करावा लागेल. अनेक नवनविन प्रयोग या संमेलनानिमित्ताने केले गेले. त्यातील किती यशस्वी झाले आणि किती फसले हे येणारा काळच ठरवेल. संमेलना समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे नोटाबंदी आणि निवडणूकां मुळे जाहिर झालेली आचारसंहिता ही होती. त्याचबरोबर बहुसंख्य मीडिया आणि जनमत हे निवडणूकांच्या साठमारीमध्ये अधिक व्यग्र होते. नोटाबंदीमुळे संमेलनासाठी आर्थिक निधी उभारणे अतिशय आव्हानात्मक आणि अशक्यप्राय बनले होते. आयोजकांपैकी काही जणांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले की ज्यांच्याकडून अगदी सहजपणे एक लाख रुपयांची देणगी अपेक्षित होती त्यांचेकडून चेकने वीस हजार रुपयांची देणगी मिळवताना सुध्दा कसरत करावी लागत होती. अखंड वाहणा-या काळ्या पैशांवर नोटाबंदीद्वारे गदा आणल्यामुळे कोटीच्या कोटींची उड्डाणे करण्या-या संमेलनासाठी काही लाख रुपये गोळा करताना आयोजक घायाकुतीला आले होते. दुसरे आव्हान म्हणजे मुंबई आणि ठाणे येथिल महानगरपालिका निवडणूका. ऐन संमेलनकाळातच निवडणूकीसाठी आचारसंहिता जाहिर झाल्याने राजकीय पक्ष आणि राजकारणी यांच्या सक्रीय सहभागावर मर्यादा आल्या. त्याचाही परीणाम संमेलनाच्या एकूण आयोजनावर झाला. अशा या खडतर परिस्थिती मध्ये श्री. गुलाबराव वझे या तरुण नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आगरी युथ फोरमने डोंबिवली येथिल साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी केले ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. या संमेलनानिमित्ताने अनेक पायंडे पाडले गेले आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

१) संमेलनातील साधेपणा : संपूर्ण संमेलन फारसा भपकारा न करता साधेपणाने संपन्न झाले. मुख्य मंडप वगळता इतरत्र साधे नेपथ्य होते. फारशी सजावट नव्हती. जेवणही साधे आणि पूर्णतः महाराष्ट्रीय पध्दतीचे होते. संपत्तीचा हिडीस भपकारा आणि प्रदर्शन दिसून आले नाही.

२) बहुजनांकडे हस्तांतरण : संमेलनाचे आयोजन अभिजन आणि प्रस्थापित वर्गाकडून बहुजन वर्गाकडे सन्मानपूर्वक आणि शांतिपूर्वक हस्तांतरित झाले. आगरी युथ फोरम या बहुजनांच्या संघटनेने या हस्तांतरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका जबाबदारीने निभावली. परिघाबाहेरील लोकांना या संमेलनामध्ये संधी दिली गेली आणि साहित्य विश्वाचे क्षितिज रुंदावण्यासाठी मदत केली.

३) अंखडपणे चाललेले काव्यहोत्र : राजन लाखे यांच्या नेतृत्वाखाली अखंड सुरु असलेल्या कवी कट्टा आणि त्यामधे प्रत्येक कवीला अगत्याने आणि सन्मानाने सहभागी करुन घेतले गेले. तसेच नवीन कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.

४) संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर परिसंवाद : संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या भाषणांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यात संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे साहित्यिक विश्लेषण करण्यात आले.

५) समिक्षा आणि अर्थ विषयांवर परिसंवाद : संमेलनामध्ये प्रथमच समीक्षा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तसेच श्री. अनिल बोकील यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक परिसंवाद आयोजित केला होता. अर्थ साक्षरतेच्या दृष्टीने संमेलनामध्ये उचललेले हे पाऊल अभिनंदनीय होते.

६) सादरीकरण करणारे आणि न करणारे यांचा काव्यानुभव : संदीप खरे, अशोक नायगावकर यासारख्या कवितांचे सादरीकरण करणा-या कवीं बरोबर प्रभाताई गणोरकर, श्रीकांत देशमुख यांसारख्या कविता सादर न करणा-या कवींच्या दिलखुलास गप्पा आणि अनुभवांची देवाण घेवाण हा एक अनोखा उपक्रम या संमेलनात राबवला गेला.

७) गझलकट्टा : यावेळी प्रथमच गझल या काव्य प्रकारांसाठी गझलकट्टा हा स्वतंत्र उपक्रम राबविला गेला. त्याचे अनोखे सादरीकरण याने रसिकांची वाहवा मिळवली.

८) अभिप्राय पेटी : संमेलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग ती लेखक असो, कवी असो, वाचक असो, विक्रेता असो सर्वांना संमेलना विषयी अभिप्राय लिहून देण्याची विनंती केली गेली. संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले. “ साहित्य सेतू ” (www.sahityasetu.org) या पुण्यातील संस्थेने हे अभिप्राय गोळा करण्याचे काम नि:शुल्क केले. या अभिप्रायांचा अभ्यास करुन त्याचा अहवाल महामंडळाला सादर केला जाईल. पुढील संमेलनाच्या आयोजनावेळी त्याचा योग्य तो परामर्श घेण्यात येईल.

९) जयंत नारळीकरांचा सत्कार : जेष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक श्री. जयंत नारळीकर यांचा सत्कार सोहळा हा कृतज्ञतेचा एक उत्तम आविष्कार होता. त्यामुळे संमेलनाची उंची वाढली.

डोंबिवली येथिल ९० व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी काही गवसले आहे असे वाटत असतानाच खालील गोष्टींमुळे बरेचसे गमावले आहे असेही जाणवले.

१) राजकीय जुगलबंदी : संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय जुगलबंदीसाठी केला गेला. कल्याण - डोंबिवली मधील २७ गावांचा प्रश्न, ज्याचा साहित्याशी दूरान्वयेही संबध नाही त्यावरील चर्चा आणि चर्वणे यांनी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ राजकीय हितसंबंधांसाठी वापरले गेले. साहित्यिक आणि प्रेक्षक यांना हताशपणे हा राजकीय तमाशा पहात बसावा लागला. त्यात संमेलनाध्यक्षांची आणि महामंडळाच्या अध्यक्षांची भूमिका असहाय्यतेची आणि हतबलतेची होती.

२) भूखंडाचे लोणी खाण्याचा प्रयत्न : साहित्य संमेलनाच्या पवित्र व्यासपिठाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला गेला. संयोजक संस्थेने त्यासाठी सरकार कडून मोठा भूखंडाचा तुकडा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. सामाजिक साधनशुचिता आणि नैतिक मुल्यांची ऐशी तैशी करुन हा आटापिटा केला गेला. ही अत्यंत शोचनीय बाब या संमेलनाने अधोरेखित केली.

३) संमेलन निमंत्रण पत्रिकेचा घोळ : राजकीय मानापमान नाट्य आणि सेलिब्रिटींना न विचारता संमेलन पत्रिका तयार केली गेली. ती दोनदा छापावी लागली. जेष्ठ राजकीय व्यक्ती, साहित्यिक यांच्या मनाचा कोतेपणा आणि त्यांच्या जाणिवेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

४) नेत्यांनी फिरवलेली पाठ : शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या सारख्या नेत्यांनी डोंबिवली येथिल संमेलनाला कस्पटा समान वागणूक दिली. त्यांच्या स्वागतासाठी रस्तांमध्ये चहूबाजूंनी भल्या मोठ्या स्वागताच्या फ्लेक्स व कमानी उभारल्या होत्या. त्यासर्वांचे हसे झाले. तसेच अमृता सुभाष, स्पृहा जोशी इ. सिनेतारकांनी ही संमेलनाला दांडी मारली.

५) कार्यक्रमांची रेलचेल मात्र नियोजन शून्य : ४ ठिकाणी मंडप आणि फुले सभागृह या ठिकाणी परिसंवाद आणि कार्यक्रमांची रेलचेल होती. पण कोणताही कार्यक्रम वेळेवर सुरु झाला नाही. अत्यंत ढिसाळ नियोजन यामुळे संमेलनाची रया गेली. परिसंवादही दिलेल्या वेळे पेक्षा एक ते दीड तास उशीरांनी सुरु होत होते.

६) तेचतेच विषय आणि सुमार निमंत्रित : परिसंवादांचे विषय तेच तेच आणि समाज जीवनापासून पूर्णतः तुटलेले होते. तसेच काही अपवाद वगळता अत्यंत सुमार दर्जाचे निमंत्रीत होते. निमंत्रितांना धड विषय माहित नव्हता. मनस्विनी लता रविंद्र यांनी परिसंवादाचा विषय आणि प्रयोजन मला कळलेच नाही असे सांगितले. खरतर संवादाची इतकी माध्यमे उपलब्ध असताना त्यांनी सहभागी होण्यापूर्वी विषय समजावून घ्यायला हवा होता. घनश्याम पाटील यांनी मात्र प्रस्थापितांची दादागिरी आणि राजकारण यांचे समर्पक वर्णन करताना वि.स.खांडेकरांनी कुसुमाग्रजांच्या काव्य संग्रहाचे स्वखर्चाने प्रकाशन केल्याची आठवण केली आणि कुठे गेले ते दिलदार आणि मोठ्या मनाचे साहित्यिक अशी विचारणा केली. अध्यक्षीय भाषणावरील परिसंवादामध्ये विजय चोरमारे यांना अध्यक्षीय भाषणा संदर्भात अचूक मतप्रदर्शन केले. मात्र भानू काळे आणि रामचंद्र साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषण तोंडीला लावून आपले विचार आणि मते यांचा श्रोत्यांवर भडीमार केला. बहूतेक परिसंवादांमध्ये ३० ते ४० श्रोत्यांची तुरळक उपस्थिती होती. मात्र अर्थ विषयक, काव्यानुभव असे काही परिसंवाद आणि कवी कट्य़ावर चांगली उपस्थिती होती.

७) अपुरी पूर्व प्रसिध्दी आणि सोशल मीडियाकडे दुर्लक्ष : संमेलनाची पूर्व प्रसिध्दी करण्यात आयोजक अपयशी ठरले. ग्रंथदिडींत सामिल झालेल्या मुलांना आणि पालकांना संमेलनाची माहिती नव्हती. संमेलनाचे संकेतस्थळ अत्यंत अर्धवट आणि अपूर्ण होते. त्यात कोणताही ताळमेळ नव्हता. सोशल मीडियावर जणू बहिष्कार टाकला गेला होता. आगरी समाज सोडून डोंबिवलीतील समाजाच्या सर्व स्तरापर्यंत कार्यक्रमाची जाहिरात पोहोचली नव्हती. संमेलनाला येण्यासाठी काहीतरी शुल्क द्यावे लागते नाहीतर प्रवेश नाही या धास्तीने लोक प्रवेशव्दारातून परत फिरत होते. जाहिरात आणि बातम्याही पुरेशा प्रमाणात दिल्या गेल्या नाहित. मीडियाचा समन्वय अत्यंत त्रोटक होता.

८) पुस्तक विक्रेत्यांची ससेहोलपट : ग्रंथदालनाचे डिझाईन अत्यंत चुकीचे होते. त्यातच अत्यल्प प्रतिसादामुळे ग्रंथ विक्रेत्यांचे कंबरडे मोडले. अ, ब आणि ई या रांगांतील स्टॉल कडे जायला जागाच नव्हती. स्टॉल भाडे आणि येण्याजाण्याचा खर्चही वसूल झाला नाही असे अनेक पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले.

९) अध्यक्षांचे प्रभावहीन भाषण : अध्यक्षांच्या भाषणने अपेक्षित परिणाम साधला नाही. त्यांच्या दिशादर्शक आणि तेजस्वी विचाराने आणि व्यक्तीमत्वाने संमेलनाला झळाळी येणे अपेक्षित असते. मात्र अध्यक्षीय भाषण बरेचसे मवाळ आणि बोटचेपे झाल्याने त्याचा एकूण संमेलनावर प्रभाव पडला नाही. गडकरी पुतळ्य़ासंबधी त्यांनी अवाक्षर काढले नाही. पुरोगामित्वच्या नादात कारण नसताना संस्कृत भाषेला कमी लेखण्य़ाचा प्रयत्न केला. पुरोगामित्वाचे भूत संमेलन, साहित्यिक आणि आयोजक यांच्या डोक्यावरुन जेवढ्या लवकर उतरेल तितके साहित्य विश्व अधिक समृध्द होईल हेही जाणवले.

१०) लांबलचक उदघाटन आणि समारोप समारंभ : आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सर्व घटक संस्थाच्या पदाधिका-यांना स्टेजवर बसवून आणि उदघाटन आणि समारोप दोन्ही कार्यक्रमांत त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात बहुमूल्य वेळ वाया घालवल्याने हे समारंभ लांबलचक, कंटाळवाणे, आणि श्रोत्यांची परिक्षा घेणारे ठरतात. खरेतर हे टाळायला हवे.

११) ढिसाळ व्यवस्थापन आणि दिशाहीन आयोजक : व्यवस्थापन ही एक कला आहे तसेच शास्त्रही आहे. त्यासाठी अनुभव, वैचारिक अधिष्ठान आणि समन्वयाचे विशेष कौशल्य आवश्यक असते. एखाद्या ज्ञाती संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणे यामध्ये जमीन आस्मानाचा मूलभूत फरक आहे. वैचारिक, बौध्दिक, समाजिक दिशादर्शक उपक्रमांचे आयोजन करताना आयोजकांची फक्त आर्थिक आणि सामाजिक ताकद पाहून चालणार नाही. त्यांची साहित्यविषयक व्यापक जाणीवही तपासून घेणे गरजेचे आहे. एकूण संमेलनाच्या ढिसाळ, बेजबाबदार आयोजनाचे प्रतिबिंब या संमेलनामध्ये अधोरेखित झाले. त्यासाठी पुरेशी पूर्व तयारी आणि गांभीर्य यांचा वापर केला असता तर संमेलन याहून अधिक परिणामकारक झाले असते.

१२) डोंबिवलीकरांचा अत्यल्प प्रतिसाद : डोंबिवली ही पुण्यानंतर महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक उप-राजधानी समजली जाते. मात्र डोंबीवलीकरांनी या संमेलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. गडचिरोली-चंद्रपूर-धारवाड-पणजी-इंदूर-भोपाळ-हैद्राबाद इ. ठिकाणाहून साहित्य रसिकांनी हजेरी लावली. परंतू डोंबिवलीकरांनी पूर्णतः पाठ फिरवली. खरतर ही चिंताजनक घटना आहे. संवादाचा, जाहिरात, प्रसिध्दीचा अभाव आणि सोशल मीडियाकडे केलेले दुर्लक्ष त्याचप्रमाणे प्रवेशासाठी मोठे शुल्क असल्याच्या अफवा यांचा संमेलनाला चांगलाच फटका बसला.

अशा प्रकारे डोंबिवली येथिल ९० वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकदाचे पार पडले. थोडे गवसले आणि बरेचसे गमावले असेच या संमेलनाचे वर्णन करावे लागेल. एक मात्र खरे की या संमेलनानंतर साहित्य विश्व “ सबनीस मुक्त ” झाले आणि त्यामुळे जाणत्या साहित्य रसिकांनी निश्वास सोडला. कारण नसताना आकांडतांडव, आक्रस्ताळेपणा करुन, असंबध्द बडबड करुन आणि कुणीतरी मला ठार मारणार आहे असा बागुलबुवा उभा करत, स्वतःचे स्तोम माजवणा-या कृतीचा उबग आला होता. “बुध्दानंतर मीच” असा तार स्वरात स्वत:चाच ढोल बडवणा-या सबनीसांना सर्व कंटाळले होते. संमेलनाध्यक्ष बंदूकधारी पोलिस संरक्षणात असे लाज आणाणारे दृष्य आपल्याला काही काळ सहन करावे लागले. जसे प्रत्यकाच्या आयुष्यातला काही काळ विसरण्यासाठी असतो तसाच हा काळ जितक्या लवकर आपण विसरू तितके चांगले. याच बरोबर डोंबिवली, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर इ. शहरांची सांस्कृतिक भूक संपली आहे का याचा आता विचार करावा लागेल. छोटी शहरे आणि जिथं साहित्य आणि सांस्कृतिक भूक आहे तिथे संमेलने आयोजित करणे ही काळाची गरज आहे. त्याच बरोबर राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मायाजाळातून साहित्य संमेलनांना सोडविणे गरजेचे आहे. साहित्य संमेलने राजकीय पुढा-यांची बटीक झाली आहेत आणि साहित्यिक मानधनासाठी मिंधे झाले आहेत. त्यांचे स्वत्व हरवले आहे आणि फुकटच्या राजेशाही सुविधांसाठी ते हपापलेले आहेत, हे चित्र बदलण्याची गरज आहे. खरतर मराठी साहित्य विश्वामध्ये हा एक आव्हानात्मक आणि संक्रमणाचा काळ आहे.

10 views0 comments
bottom of page