top of page
Writer's pictureProf. Kshitij Patukale

आम्ही सारे भ्रष्टाचारी अर्थात भ्रष्टाचार साक्षरता

आरोग्यं परमो सन्तोष: परमं धनम ।
विश्वास: परमं मितं राष्ट्रसेवा परं सुखम ॥

जीवनातील सर्वात उत्तम लाभ म्हणजे चांगले आरोग्य, सर्वोत्कृष्ठ धन म्हणजे समाधान, सर्वोत्कृष्ठ मित्र म्हणजे परपरांवरील विश्वास आणि सर्वोत्कृष्ठ सुख म्हणजे राष्ट्राची, देशाची सेवा असा वरील सुभाषिताचा अर्थ आहे. परंतु आजची परिस्थिती काय आहे? जीवनातील सर्वोत्कृष्ठ लाभ म्हणजे पैसा, सर्वोत्कृष्ठ धन म्हणजे पैसा, सर्वोत्कृष्ठ मित्र म्हणजे पैसा आणि सर्वोत्कृष्ठ सुख म्हणजेही पैसा. पैसा... पैसा... आणि फक्त पैसा. कसाही, कोणत्याही मार्गाने, कुणाचाही पैसा आपण फक्त ओढायचा, ओरबाडायचा आणि आपल्या ताब्यात ठेवायचा. आपल्या पुढच्या सात पिढ्याच नव्हे तर शंभर पिढ्यांसाठी लागणारी संपत्ती आत्ताच, याच जन्मात आपल्याला गोळा करून ठेवायची आहे असेच जणू प्रत्येकाने ठरविलेले आहे. पैशाने जगातील प्रत्येक गोष्ट विकत घेता येते अशी प्रत्येकाची खात्री आहे. आरोग्य असो वा समाधान, कुटुंब सौख्य असो की मान सन्मान, या जगात कोणतीही अशी गोष्ट नाही की जी पैसे फेकल्यावर मिळू शकत नाही, अशी प्रत्येकाची खात्री झालेली आहे. अशा एका विचित्र कालखंडामध्ये मानवी जीवनमूल्ये सर्रास पायदळी तुडवून जो तो पैसा गोळा करायच्या मागे लागला आहे. या वृत्तीचे प्रकट रुप म्हणजेच भ्रष्टाचार. भ्रष्टाचार या शब्दाचा सोपा असा अर्थ आहे भ्रष्ट आचार. चुकीचा आचार. चुकीची कृती. भ्रष्टाचाराचा अर्थ फक्त पैसा खाणे असा नाही. भ्रष्टाचार म्हणजे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या कृतीने स्वत:चा फायदा करुन घेणे. तो फायदा फक्त पैशांच्या रुपातच असेल असे नाही. भ्रष्टाचार हा एक फार मोठा विषय आहे. त्यावर अनेक वर्षे आणि शतके चर्चा सुरु आहे. त्याचा विस्तार आणि व्यापकत्त्व यावरही बराच विचार झाला आहे.


भ्रष्टाचाराचा आवाका आणि व्याप्ती यावरही अनेक अंगांनी चर्चा झाली आहे. एकंदरीत भ्रष्टाचाराने आपले जीवन पूर्णत: ग्रासले आहे. संपूर्ण समाजजीवन भ्रष्टाचाराने नासून गेले आहे. सामाजिक असमतोल आणि विषमता भ्रष्टाचारामुळे सतत वाढत आहे. भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग सर्व समाजाला, देशाला आणि विश्वाला गिळून टाकेल असे वाटते. भ्रष्टाचाराविषयी सर्व प्रकारचा उहापोह झाला आहे. भ्रष्टाचार दूर करण्याची फार मोठी गरज आहे यावरही सर्वांचे एकमत आहे. ते कसे करायचे, त्याचा नि:पात कसा करायचा आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यातून समाजाला कसे मुक्त करायचे याविषयी अनेक उपक्रम सुरु आहेत आणि अनेक नवनविन उपक्रम तयार होत आहेत. मात्र या लेखाचा विषय आहे की लोक, सर्वसामान्य जनता हा भ्रष्टाचार सहन का करते? उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचाराचे दैनंदिन दर्शन घडत असतानाही लोक काहीही कृती का करत नाहीत? विरोध का करीत नाहीत ? तोंड दाबून बुक्यांचा मार का सहन करीत राहतात? यामागे कोणते रहस्य लपले आहे? या अनाकलनीय सहनशक्तीचे मूळ कशात आहे? याचा शोध घेणे हा या लेखाचा मुख्य हेतू आहे.

अगदी छोट्या पातळीपासून वरवरच्या प्रत्येक पातळीवर भ्रष्टाचार पसरला आहे. त्याने एकूण समाजजीवनावर घट्ट विळखा घातला आहे. त्याच्यापासून सुटका करुण घेणे किंवा भ्रष्टाचाराचा अजस्त्र विळखा तोडणे हे जवळपास अशक्य आहे. भ्रष्टाचार ही एक सहज प्रवृत्ती आहे आणि ती प्रत्येकाच्या नसानसात भिनली आहे असे सांगितले जाते. त्यासाठी शंकराच्या मंदिरात जाताना नंदीला खुष करावे लागते असे उदाहरण दिले जाते. अशा प्रकारच्या चित्रविचित्र संदर्भांनी एक प्रकारे भ्रष्टाचाराचे समर्थनच केले जाते. तो कसा आवश्यक आहे, तो करण्यात कसा शहाणपणा आहे आणि त्याच्या शिवाय कोणतेही काम करणे कसे अशक्यच आहे, याचीच चर्चा केली जाते आणि अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला मान्यता दिली जाते. वस्तुस्थिती अशी आहे की आज समाजातील प्रत्येक जण भ्रष्टाचारी बनले आहेत. कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीने आज सर्व समाज भ्रष्टाचारी झाला आहे. काही अपवाद वगळता संपूर्ण समाज भ्रष्टाचारी झाला आहे. तो तसा झाला आहे हे त्याला कळत नाही असे नाही. पण जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वत:चे समर्थन करीत आहे. अगदी साधी गोष्ट घ्या. बाजारात, प्रवासामध्ये कोणतेही शीतपेय घ्या. त्यावर एक छापील किंमत आहे. त्यापेक्षा अधिक रक़्कम दुकानदार वसूल करतो. त्याला विचारले तर तो म्हणतो की फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लाईट बिल खूप येते त्यामुळे आम्ही जास्त पैसे आकारतो. खरतर शीतपेये ही शीत स्वरुपामध्येच देणे अपेक्षित आहे. छापील किंमतीमध्ये दुकानदाराला भरपूर कमिशन दिले जाते. त्यामध्ये वीजबिलाचाही अंतर्भाव आहे. तरीही तो दुकानदार अत्यंत निर्लज्जपणे बिनादिक़्कत आपली लूट करतो. काही विचारल्यावर अंगावर येतो, खेकसतो. पाहिजे तर घ्या नाही तर चालू लागा असे सुनावतो. त्याचे बील दे असे म्हटल्यास हाकलून देतो. आपण असहाय्य होतो. मुकाट्याने ती वस्तू घेतो. कशाला वाद घालायचा आणि डोक्याला त्रास करुन घ्यायचा असे म्हणतो आणि अपमान सहन करीत त्या शीतपेयाचे सेवन करतो आणि डोक्यातून तो विषय काढून टाकतो. खरतर तो दुकानदार भ्रष्टाचार करीत असतो. चोरी करीत असतो. लूटमार करीत असतो. पण आपण काहीही करु शकत नाही. एखाद्या गरीब खिसेकापूने पोटासाठी जर पाकीट मारले, चोरी केली तर लोक त्याला पकडून बेदम मारहाण करतात. पोलीस कोठडीत त्याला मारपीठ होते. मात्र इथे दिवसा ढवळ्या तुडुंब पोट भरलेला दुकानदार आपल्याला अक्षरश: लुटतो आपण सगळे मुकाट्याने सहन करतो. असे का घडते ? सर्वसामान्य नागरिक हे सर्व का सहन करतात ? याचे काय कारण आहे ? कदाचित आपण हे सारे सहन करतो कारण आपणही कुठेतरी भ्रष्टाचार करीत असतो. आपणही कुठेतरी पापाचा पैसा मिळवत असतो किंवा चुकीच्या भ्रष्ट मार्गाने आचरण करीत असतो. आपल्या अंत:र्मनामध्ये खोलवर कुठेतरी आपल्यामध्ये ही जाणीव असते की आपणही भ्रष्टाचार करीत आहोत. आपणही चुकीचे आचरण करीत आहोत. चुकीच्या मार्गाने पैसा मिळवत आहोत, फायदा करुन घेत आहोत. मग आपल्याला इतरांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवण्याचा अधिकार आहे का? आपण दुसऱ्या भ्रष्टाचाऱ्याला नावे ठेवू शकतो का? कदाचित हा अंत:र्मनातील आवाजच आपल्याला इतरांचा भ्रष्टाचार सहन करण्याचा आदेश देत असतो. आपणही मग आपले मन मुर्दाड बनवून नैतिकता आणि जीवनमूल्ये धाब्यावर बसवून इतरांचा भ्रष्टाचार सहन करतो आणि आपल्या भ्रष्टाचाराचे अनैतिक समर्थन करीत राहतो.


अजून थोड्या विस्ताराने आपण हा विचार समजून घ्यायचा प्रयत्न करुया. आपला एक भोळा भाबडा समज आहे की या देशात फक्त सरकारी नोकर आणि राजकारणीच भ्रष्टाचार करताना देशाच्या संपत्तीची लूट करतात. सरकारी नोकर भरपूर पगार घेवूनही पुन्हा निर्लज्जपणे प्रत्येक कामामध्ये पैशाची मागणी करुन अक्षरश: संपत्ती ओरबाडत असतात. समाजसेवेच्या बुरख्याखाली राजकीय पुढारी सौदेबाजी करुन करोडोंची संपत्ती गोळा करतात हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. एखादा टुकार नेता नगरसेवक होतो. त्याच्या घरी दोन वेळचे खायचे वांदे असतात. पाच वर्षांमध्ये तो काही कोटींचा मालक होतो. मंडईमध्ये फुले विकणारा माणूस ९०० कोटींची संपत्ती गोळा करतो. आपण मठ्ठपणे आणि हताशपणे सर्वकाही पहात राहतो. सहन करीत राहतो. पण माझा मुद्दा आहे. आपण असे का करतो?


याचे खरे कारण आहे की आपण सारे भ्रष्टाचारी झालो आहोत. समाजामध्ये आढळणारे विविध स्तरावरचे लोक नक़्की काय करतात आणि कशा रितीने आपला उद्योग, व्यवसाय, नोकरी, मजूरी करतात ते आपण पाहूया. यासाठी विविध व्यक्तींचा आपण विचार करुया. सुरवात वैद्यकीय पेशापासून करुया. पूर्वी साक्षात भगवंताचा अवतार असणारा डॉक्टर हा हैवानापेक्षाही भयंकर झाला असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. कोणत्याही रोगाचे निदान होण्यासाठीच आता किमान तीस चाळीस हजार खर्च करावे लागतात. ही चाचणी करा. ती चाचणी करा. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची आपण मदत घेऊया असे साळसूदपणे सांगताना तो डॉक्टर प्रत्येक चाचणीमागे कट प्रॅक्टीसने मिळणारे उत्पन्न याचा हिशोब मनातल्या मनात करीत असतो. पूर्वी कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणत असत. आता डॉक्टरची पायरी चढू नये असे म्हणायची पाळी आली आहे. अपवादासाठी सुद्धा अपवाद असे प्रामाणिक डॉक्टर मिळण्याची शक्यता आता जवळपास संपली आहे. एखाद्या वकीलाकडे जावे आणि आपल्या समस्येवर कायदेशीर सल्ला घ्यावा तर त्याची फी ऐकून पोटात गोळा उठतो. शिवाय फिर्यादी आणि आरोपी दोन्ही पक्षांचे वकील एकमेकांना सामिल होवून तारखांवर तारखा घेत आपापल्या अशीलांची लूट करीत असतात. प्राध्यापक आणि शिक्षक शाळांमध्ये किती शिकवतात हा एक संशोधनांचा विषय आहे. लाखाच्या घरात दरमहा पगार घेणारे प्राध्यापक आणि हजारोंचा पगार घेणारे शिक्षक प्रत्यक्ष त्यांचे काम कसे पार पाडतात ते आपण उघड्या डोळ्यानी पहात आहोत. शहरांमध्ये तर विद्यार्थी क्लासेसमध्ये शिकतात, प्राध्यापक कॉलेजमध्ये टाइमपास करतात आणि पालक हताशपणे सगळे पाहत बसतात अशी स्थिती आहे. विमा एजंट विमा विकताना त्याला सगळ्यात जास्त कमिशन मिळवून देणारी पॉलिसी आपल्या गळ्यात मारतो आणि क्लेम झाल्यावर कंपनीकडे बोट दाखवून तूम्ही आणि कंपनी बघून घ्या असे सुनावतो. कपडे घ्यायला बाजारामध्ये कपड्याच्या दुकानात जातो. त्याला आधीचे स्टीकर काढून नविन स्टीकर चिकटवलेले असतात. कपड्यांची मूळ किंमत आणि त्यावर दुकानदाराने लावलेली किंमत यामधील तफावत समजली तर डोके चक्रावून जाते आणि तिप्पट चौपट किंमत बिन दिक़्क़तपणे उकळणारा व्यापारी पाहू मन विषण्ण होते. सकाळी दूध घालायला येणारा गवळी पाण्यात किती दूध घालतो आणि किती यूरिया मिसळतो या विचाराने मन अस्वस्थ होते. सोनाराकडे दागिने घेताना ते नक़्की किती कॅरेटचे आहे आणि ते दागिने मोडताना केली जाणारी मोड आणि वजनातील कपात याने जीवाचा थरकाप होतो. बाजारात जावून भाजीपाला खरेदी करताना त्याचा हिरवागार रंग बघून मनात येते की याने कोणत्या केमिकलचा स्प्रे भाज्यांवर मारला आहे म्हणून या भाज्या इतक्या हिरव्यागार आणि ताज्या दिसत आहेत. फळे खरेदी करताना त्यावरचे डाग बघून वाटते की कोणते केमिकल वापरुन याने फळे पिकवली आहेत. कपडे शिवायला शिंप्याकडे जावे तर तो जास्तीचे कापड घेवून आपल्याला फसवतो असे वाटते. हॉटेलमध्ये जावून इडली सांबर खायचा तर त्यासाठी पन्नास रुपये मोजायचे. इडलीचा आणि सांबर तयार करायला येणारा खर्च किती आणि इतर खर्चाच्या नावाखाली किती लूट हॉटेलचालक करतात. शिवाय हॉटेलमधील अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता आणि आरोग्य याची कितपत काळजी घेतली जाते त्याविषयी काहीही माहिती नाही. एकदा नाशिकमध्ये छोटी टाळ ४० रुपयांना खरेदी केली. दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर इथे देवळाबाहेरील दुकानात विचारले तर तीच टाळ १२० रुपयांना सांगितली. म्हणजे मूळ किंमत किती आणि त्यावर नफा किती याला काही प्रमाणच नाही. पॅकबंद पिशवीतून जे दूध घेतले जाते त्यातील सर्व क्रीम काढलेली असते आणि शेतकऱ्याला दिलेल्या किंमतीच्या तिप्पट दराने ते आपल्या माथी मारले जाते. घरात लाईट कनेक्शनचे काम करायचे आहे त्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलावले तर तो जास्तीत जास्त रुपये उकळायचा प्रयत्न करतो. जे सामान वापरतो त्याचा दर्जा आणि किंमत यातील फरक आपल्याला कळत नाही. अत्यंत प्रभावी व्याखाने, प्रवचने आणि किर्तने देणारे मानधनासाठी आणि सुखसोयींसाठी अडून बसतात. त्यागाच्या आणि समाजसेवेच्या गप्पा मारणारे प्रत्यक्ष जीवनामध्ये अत्यंत लालची आणि लोभी असतात. बोलघेवडे आणि स्वत:वरच खूश असलेले लेखक आणि साहित्यिक अत्यंत मिंधेपणाने वागतात. खोट्या मतदान पत्रिका तयार करुन आणि खोटे मतदान करुन साहित्य आणि नाट्यसंस्था बळकावतात. मॅकॅनिक आणि गॅरेजमध्ये गाडी नेली तर नवा पार्ट काढून जूना बसवतात किंवा नवा बसवला असे सांगून जूनाच बसवतात. बॅंकेमध्ये गेल्यावर कर्ज मागताना जणू भिकाऱ्यासारखे वागवतात. कर्ज मंजूर करताना काहीतरी अपेक्षा धरतात. टेलिफोन बसवताना, दुरूस्त करतानाही कर्मचारी काहीतरी पैसे मागतात. पेपर वितरण करणारा तिथले कमिशन घेवून पुन्हा काहीतरी वरती मिळावे अशी अपेक्षा करतो. रेल्वेचा तिकीट बुकींग एजंट तिकीटावरती कमिशन म्हणून विविध कारणे सांगून दुप्पट पैसे मागतो. कचरा गोळा करणारा कामगार पगार घेवूनही काहीतरी रक़्कम दरमहा मागतो. औषधांच्या दुकानामध्ये किती नफेखोरी आहे आणि डुप्लिकेट औषधे विकली जातात हे कुणालाही कळत नाही. औषधे बनवणाऱ्या कंपन्या, डॉक्टर्स आणि औषध विक्री दुकाने यांची अभद्र युती सतत आपल्याला नाचवत असते. रिक्षा किंवा टॅक्सीत बसले की मीटरमध्येच काहीतरी गोम करून ठेवलेली असते की प्रत्यक्ष अंतरापेक्षा खूप वेगाने मीटर पळत असते. भाड्याने गाडी करुन प्रवासासाठी निघावे तर त्याच्याही मीटरमध्ये काहीतरी कलागत केलेली असते. पेट्रोल पंपावर पेट्रोल/डिझेल भरताना त्यातील मीटरमधून आणि सूट्या पैशातून होणारी लूट मोठी की त्या इंधनामध्ये काहीतरी मिसळून केली जाणारी लूट मोठी हा संशोधनाचा विषय आहे. शिक्षण महर्षी आणि शिक्षण संचालक यांनी सरस्वतीची दुकाने थाटली आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना लुटायचे आणि दुसरीकडे सरकारला लुटायचे. मग लुटले गेलेल्या विद्यार्थ्यांनी वसुली करण्यासाठी समाजाला लुटायचे. अगदी धार्मिक कार्ये करताना रुद्राभिषेक करतो असे सांगून जलाभिषेक करणारे आणि सत्यनारायणाची पूजा अर्ध्या तासात संपवणारे भटजी आपण पाहतो. सगळे जण नुसते इतरांना लुटायला टपलेले आहेत. अगदी मोलमजूरी करणारे कामगारही कामामध्ये टाळाटाळ आणि विनाकारण खोळंबा करतात. समाजसेवेच्या नावाने गळा काढणारी हॉस्पीटल्स नविन पेशंट येईपर्यंत गादीवऱच्या पेशंटला बरा होवू देत नाहीत. या सगळ्यावर कहर म्हणजे उद्योगपती, सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिक बेसुमार लूट करीत असतात. शेतमालामध्ये जरा देखील वाढ झाली तर गळा काढणारे नागरिक आणि सरकार एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत किती असावी यासाठी उद्योजकावर कोणतेही नियंत्रण आणत नाहीत.


किती प्रमाणामध्ये किती पटीने नफेखोरी करायची याचे कोणतेही प्रमाण नाही. आयकर अधिकाऱ्यांची भीती दाखवून चार्टर्ड अकाउंटंट लुबाडतो. कायद्याचा धाक दाखवू ऑडिटर लुबाडतो. सेवेचे मूल्य किती घ्यावे याला काही घरबंध नाही. समाजजीवनाच्या उतरंडीवर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण दुसऱ्याला लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वत:चाच अधिकाधिक फायदा करुन घ्यायचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तो कुणाचीही पर्वा करायला तयार नाही. भ्रष्टाचार, चुकीचे वर्तन, चुकीची कृती अशी कोणतीही गोष्ट तो मानायला तयार नाही. समजून घ्यायला तयार नाही. बाकीचे लुटतात, बाकीचे भ्रष्टाचार करतात. मग मी कोणता गुन्हा केला आहे. मलाही करु दे भ्रष्टाचार अशी त्याची धारणा आहे. कुणालाही कुणाबद्दल विश्वास नाही. जीवन जगताना प्रत्येक पायरीवर आपल्याला लुबाडले जात आहे. तेव्हा मी सुद्धा शक्य तितके इतरांना लुबाडले पाहिजे अशीच सार्वजनिक भावना आहे. ज्याप्रमाणे मांजर दूध पिताना डोळे मिटून घेते आणि आणि तिला वाटते की आपल्याला कोणी बघत नाही तसेच प्रत्येकाला वाटते की कोण बघतय आपल्याला.. काय होणार आहे आपल्याला भ्रष्टाचार केल्यावर... जाऊदे बघुया काय होतेय ते. पकडल्यावर बघू काय करायचे ते. एवढ्याश्या भ्रष्टाचाराने काय मोठा फरक पडणार आहे ? असा विचार प्रत्येक जण करीत आहेत. या सगळ्या अवस्थेमध्ये आपण सर्वजण व्यक्तीश: आणि एकंदरीत समाज म्हणून हतबल आणि असहाय्य झालो आहोत. काय होणार आहे पुढे, मुलांचे भविष्य कसे असेल, पुढचे जग कसे असेल या विचाराने मती कुंठीत होवून जाते. सर्व समाज दुभंगलेला, भ्रष्ट आणि नितीमूल्य हीन असा झालेला आहे. भ्रष्टाचार कधीतरी संपेल अशी शक्यता कुणालाही वाटत नाही. इतरांचा भ्रष्टाचार मी सहन करतो कारण मी स्वत: भ्रष्टाचारी आहे. “तेरी भी चूप... मेरी भी चूप” असा सर्व मामला आहे.


या संक्रमण अवस्थेमध्ये तुम्ही, आम्ही, आपण सारे भ्रष्टाचारी अशी समाजाची अवस्था झाली आहे. अत्यंत भंपक, दुतोंडी आणि आभासी जीवनात सगळे जण रममाण झाले आहेत. भ्रष्टाचाराचे मूळ कारण अज्ञानामध्ये आहे. भ्रष्टाचार नियंत्रणामध्ये कदाचित तंत्रज्ञान फार मोठी भूमिका बजावू शकेल. किमान सरकारी शिष्यवृत्ती, पेन्शन, सहाय्य इ. रक़्कमा कोणत्याही मध्यस्थ आणि भ्रष्टाचाराशिवाय आता लाभार्थीच्या खात्यात जमा होवू लागल्या आहेत. पण भ्रष्टाचाराचे मूळ माहिती नसण्यात आणि अज्ञानामध्ये आहे. त्यामुळे त्यावर भ्रष्टाचार साक्षरता हा चांगला उपाय ठरु शकेल. भ्रष्टाचार साक्षरता म्हणजे भ्रष्टाचार कसा होतो, कुठे कुठे होतो आणि कशा पद्धतीने होतो त्याविषयी जागृकता निर्माण करणे. उदा. डॉक्टर कशा प्रकारे भ्रष्टाचार करतो, फार्मासिस्ट कसा फसवतो, वकील कशा प्रकारे फसवू शकतो, रिक्षाचे मीटर फास्ट कसे केले जाते, भाजी पाला कसा हिरवागार आणि ताजा केला जातो, रस्त्याच्या बांधकामामध्ये आणि दुरुस्तीमध्ये कसे पैसे खातात, खाणी किंवा नदीमधील बेकायदेशीर वाळू उपसा कसा केला जातो, औषध दुकानामध्ये कशी नफेखोरी चालते, बॅंकांमध्ये कशाप्रकारे चुकीची कृत्ये होतात, मेकॅनिक कशाप्रकारे फसवणूक करण्याची शक्यता असते याबद्दल माहिती देणे. एका अर्थाने भ्रष्टाचार कसा चालतो, त्याची प्रक्रिया कशी चालते याबाबत जागृकता निर्माण करणे. यालाच भ्रष्टाचार साक्षरता असे म्हणता येईल. एकमेकांचे पोल खोलणे किंवा फसवाफसवीचे रहस्य उघड करणे म्हणजे भ्रष्टाचार साक्षरता. एकदा भ्रष्टाचार कसा होतो हे समाजाला कळू लागले की ते त्यातून बचाव करण्यासाठी स्वत:हून मार्ग शोधून काढतील. भ्रष्टाचारापासून वाचण्याचा प्रयत्न करतील. एका अर्थाने भ्रष्टाचार साक्षरता म्हणजे सामाजिक जाणीवांची साक्षरता असेल. त्यालाच सजग नागरिकत्त्वाची साक्षरता असे म्हणता येईल. भ्रष्टाचाराच्या भस्मासूराशी सामना करताना नवनविन प्रयोग करावे लागतील. विविध पायऱ्यांवर आणि विविध आघाड्यांवर हे प्रयोग करावे लागतील. भ्रष्टाचार साक्षरता हा खरतर एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. या लेखामध्ये त्याची तोंडओळख करुन द्यायचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार साक्षरता भ्रष्टाचाराशी लढायला एक व्यापक जाणीव नक़्की उपलब्ध करुन देईल याची खात्री वाटते.

9,190 views0 comments

Comments


bottom of page