साहसी अध्यात्मिक यात्रा परीक्रमा म्हणजे ज्यात साहस आहे आणि अध्यात्मिक व धार्मिक संकल्पनाही जोडलेल्या आहेत अशा यात्रा आणि परिक्रमा.

साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा या नावावरून प्रथमदर्शनी असे वाटेल की हा कोणता पर्यटनाचा नवीन प्रकार आहे ? साहसी अध्यात्मिक यात्रा परीक्रमा म्हणजे ज्यात साहस आहे आणि अध्यात्मिक व धार्मिक संकल्पनाही जोडलेल्या आहेत अशा यात्रा आणि परिक्रमा. त्याआधी आपण पर्यटन, तीर्थयात्रा आणि साहसी पर्यटन या संकल्पना नीट समजून घेऊया. तीर्थयात्रा आणि पर्यटन या संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे. पर्यटन हे मुख्यतः हवापालट, रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून कोठेतरी दूर, शरीराला आराम देणारी, सूखसोई पुरवणारी आणि खाण्यापिण्यासाठी मुबलक व्यवस्था उपलब्ध करून देणारी अशी संकल्पना आहे. पर्यटन म्हणजे दूरच्या ठिकाणी जावून फिरणे, खाणेपिणे आणि चैन करणे असाच बव्हंशी समज आहे. त्यामुळे आतापर्यंत पर्यटन म्हणजे महाबळेश्वर, लोणावळा, पन्हाळा, बंगलोर, गोवा, काश्मिर, कूलू मनाली, उटी, कोडाई कॅनाल, केरळ, जयपूर, माऊंट अबू, इ. ठिकाणांचीच चलती होती. यात काही ठिकाणे थंड हवेची, काही समुद्र किनाऱ्याजवळची, काही ऐतिहासिक वारसा सांगणारी, काही आधुनिक स्थापत्यशास्राचे दर्शन घडविणारी आणि बहुधा जीभेचे चोचले पुरवणारी ठिकाणे आहेत. त्यामुळे सुट्टीमध्ये कुठे जायचे तर अशाच पर्यटनस्थळी धमाल करायला, दंगा करायला जायचे हीच संकल्पना रूढ आहे. अशा ठिकाणी सुट्टी घालवायची, सर्वकाही विसरून, बेभान होवून उपभोग घ्यायचा आणि पुन्हा परत येवून येरे माझ्या मागल्या म्हणून आपला नित्यक्रम सुरू करायचा ही पर्यटनाची संकल्पना जनमानसामध्ये रूढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्री हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बहरला. साधी हॉटेल्स, गेस्ट हाऊस, याच बरोबर त्रि-तारांकीत, पंच-तारांकीत हॉटेल्स संस्कृतीचा उदय झाला. हॉटेलमधील मोठ्या खोल्या, एसी, प्रशस्त बाथरूम्स, ऑन कॉल सुविधा, उच्च दर्जाचे इंटेरियर, इंटरकॉम सुविधा, अत्यंत आदबशीर असे आतिथ्य यामुळे दोन-चार दिवसासाठी का होईना राजेशाही थाटाचे जीवन अनुभवण्याची संधी पर्यटनाद्वारे प्राप्त झाली.
गेल्या काही दशकांमध्ये विशेषतः १९९० नंतर भारताची अर्थव्यवस्था बदलली. अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली. सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये विशेषतः मध्यमवर्गियांच्या हातात भरपूर पैसा खेळू लागला. दरडोई उत्पन्न वाढले. त्यामुळे आपल्याच घरामध्ये एसी पासून इंटेरियर, एल.सी.डी. टि.व्ही. वॉशिंगमशिन आणि सर्व प्रकारच्या आधुनिक सुख सुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे पर्यटनासाठी एखाद्या ठिकाणी जावून ज्या आरामदायक सुखसोई अनुभवायच्या त्या आता आपल्याच घरात उपलब्ध झाल्या. पर्यटनस्थळी जायचे, एसी रूम मध्ये रहायचे, इडली डोसा आणि पिझ्झा खायचा यात नाविन्य असे काही राहिले नाही. कारण ते सर्व सहजतेने घरातच आणि आजूबाजूला उपलब्ध होऊ लागले. त्यातून माणसे नाविन्याचा शोध घेऊ लागली.
तीर्थयात्रा ही एकदम वेगळी संकल्पना आहे. प्रत्येक भारतीयाच्या अंतर्मनामध्ये तीर्थयात्रा ही संकल्पना कूठेतरी खोलवर रूजली आहे. जणूकाही जन्मतःच त्याच्या रक्तामध्ये तीर्थयात्रा भिनलेली आहे. तीर्थयात्रा ही एक धार्मिक आणि अध्यात्मिक संकल्पना आहे. संपूर्ण भारत देश म्हणजे तीर्थक्षेत्रांचे आगर आहे. देशाच्या प्रत्येक भागामध्ये असंख्य प्रकारची हजारो तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येक ठिकाणाबरोबर जोडलेला काही इतिहास, काही श्रद्धा, काही कथा आणि काही परंपरा आहेत. पाप पुण्याच्या आणि दानधर्माच्या काही संकल्पना आहेत. प्रत्येक माणसाला मग तो गर्भश्रीमंत असो किंवा अत्यंत गरीब असो. त्याला जोडून घेणारी, त्याला पर्यटनाची संधी देणारी आणि त्याच्यासाठी उचित व्यवस्था उपलब्ध असणारी ही तीर्थक्षेत्रे आहेत. तीर्थक्षेत्रांची ही परंपरा हजारो वर्षे या देशामध्ये आहे. कोणतेही एटीएम कार्ड बरोबर नसताना, बिसलरी पाण्याची बाटली बरोबर नसताना आणि कंन्फर्म बुकींग नसतानाही हजारो माणसे कन्याकुमारीपासून कैलासापर्यंत आणि गांधारापासून ते कंबोडियापर्यंत अगदी निर्धास्तपणे तीर्थयात्रा करीत असत. लहान-लहान राज्यांमध्ये सतत लढाया सूरू असूनही यात्रेकरू बिनदिक्कतपणे तीर्थयात्रा करीत असत. याचे कारण म्हणजे “ अतिथी देवो भवं ” ही अदभूत संकल्पना ! “ केल्याने देशाटन, मनुष्यास येते शहाणपण ” यावर श्रद्धा होती आणि आजही ते खरे आहे. जन्मात एकदा तरी काशीयात्रा करावी अशी प्रत्येक भारतीयाच्या अंतर्मनामध्ये सुप्त इच्छा असते. असे म्हणतात की हजारो वर्षांचा इतिहास भारतात धुंडाळता तर असे दिसून येते की दरवर्षी भारतातून १० हजारातून एक व्यक्ती काशी रामेश्वराची यात्रा करते, २५ हजारातून एक व्यक्ती बद्रीकेदार चारधाम यात्रा करते, एक लाखातून एक व्यक्ती नर्मदा परिक्रमा करते, १० लाखातून एक व्यक्ती कैलास मानसरोवर यात्रेअला जाते आणि ५० लाखातून एखादी व्यक्ती स्वर्गारोहिणीला जाते. तीर्थक्षेत्रांमध्ये काशी रामेश्वर बरोबरच बारा ज्योतिर्लिंगे, चारधाम, गंगासागर, देवीची शक्तीपीठे, अष्टविनायक, मुक्तीनाथ, पशुपतिनाथ, तिरूपती, शिर्डी, शेगाव, अय्यप्पा शबरीमलाई, द्वादश खंडोबा, इ. अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. याचबरोबर कुंभमेळे, अर्धकुंभ, सिंहस्थ, कन्यागत महापर्वकाल, इ. अनेक तीर्थक्षेत्रांचे सोहळेदेखील सुरू असतात. यामध्ये कोट्यावधी नागरीक सहभागी होत असतात. अर्थात तीर्थक्षेत्रे या संकल्पनेमध्ये सोयीसुविधा, पंचतारांकित आतिथ्य, ऑनकॉल सेवा पुरवणारे सेवक या गोष्टी अपेक्षित नाहीत. तीर्थक्षेत्राचे धार्मिक, अध्यात्मिक महात्म, स्नानाचा किंवा पर्वणीचा मुहूर्त या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. सोय गैरसोय हा महत्त्वाचा मुद्दा नसतो. तर अशा ठिकाणी येणारी दैवी अनुभूती याला अधिक महत्व असते. विविध देवदेवतांच्या जत्रा, यात्रा , मेळे इ. तीर्थक्षेत्रांबरोबर आणि गावागावातून देवस्थानांबरोबर जोडले गेलेले उत्सव समारंभ सतत सुरूच असतात. तीर्थयात्रा ही एक अत्यंत व्यापक संकल्पना असून निसर्ग, पर्यावरण, समाजजीवन, सहजीवन, विविध प्रकारचे जनसमूह, जीवनशैली, परंपरा, संस्कृती या सर्वांचा समन्वय साधून त्यातून एकत्वाचा आणि समग्रतेचा अनुभव देणारी एक रोमांचक संकल्पना आहे. पर्यटनाच्या पलिकडे जावून माणसाला सर्वार्थाने समृद्ध करणारी एक पवित्र संकल्पना म्हणजे तीर्थयात्रा. पर्यटन आणि तीर्थयात्रा या दोन टोकांमध्ये विभागले गेलेले भारतीय एकतर चैन, बदल आणि आराम म्हणून पर्यटनाच्या वाटेला जातात किंवा पूर्णतः धार्मिक संकल्पनां म्हणून तीर्थयात्रा करीत असतात.
मात्र गेली काही वर्षे विशेषतः इ. स. २००० नंतर साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा हा एक नविन फंडा उदयाला आला आहे. हिमालयामध्ये जाणारे पर्यटक म्हणजे एकतर निखळ पर्यटनासाठी, मजा, चैन करण्यासाठी जातात किंवा फक्त धार्मिक कारणांसाठी जातात असे दिसून येते. गेल्या काही वर्षामध्ये हिमालयामध्ये साहसी ट्रेक्स म्हणजे गिर्यारोहण, पथभ्रमण, पदभ्रमण आणि साहसी खेळ खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येवू लागले आहेत. यामध्ये पर्यटनाबरोबरच साहस, शारीरिक श्रम आणि कष्टदायक परंतू वेगळा आनंद देणारा अनुभव असे त्याचे स्वरूप झाले. भारत सरकारने ९० च्या दशकामध्ये कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याला सुरूवात केली. त्यामुळे अशा साहसी पर्यटकांना एक नविन दालन खुले झाले. देशातून अनेक लोक कैलास मानसरोवर यात्रेमध्ये सहभागी होऊ लागले. हिमालयातील अत्यंत खडतर, दीर्घकालीन ( साधारणपणे २१ ते २८ दिवस ) आणि यात्रेकरूंच्या शारीरिक, मानसिक सामर्थ्याची परिक्षा पाहणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेमधील गर्दी वाढू लागली. याच दरम्यान प्रख्यात नृत्यांगना आणि सिनेअभिनेत्री प्रोतिमा बेदी यांचा कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान हिमवादळामध्ये मृत्यू झाला. त्या घटनेला मीडियामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचा परिणाम असा झाला की लोक मोठ्या प्रमाणावर कैलास मानसरोवर यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे नोंदणी करू लागले आणि शेवटी सरकारला लॉटरी काढून यात्रेकरूंची संख्या मर्यादित करावी लागली, मात्र त्यामुळे अशा प्रकारच्या यात्रा परिक्रमांकडे यात्रेकरूचा ओघ वाढू लागला. २००७ साली जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदे हर ’ हे नर्मदा परिक्रमेवरील अनुभव कथन करणारे पुस्तक प्रकाशित झाले. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘ कर्दळीवन एक अनुभूती ’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दत्त परिक्रमा, स्वर्गारोहिणी, कैलासमानसरोवर, पंचकैलास, इ. अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यातून मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या परिक्रमांचे बीज रोवले जाते. नर्मदा परिक्रमा वर्षातून काही शेकडा लोक करीत होते तिथे आता पायी परिक्रमेबरोबरच वाहनाने परिक्रमा सुरू झाल्या. वर्षाला आता १० ते १५ हजार लोक नर्मदा परिक्रमा करतात. यामध्ये परिक्रमा आयोजित करणारे बसने किंवा स्वतंत्र वाहनानेही परिक्रमा करू लागले आहेत. कर्दळीवनामध्ये आता वर्षाला २ ते ३ हजार लोक परिक्रमा करू लागले आहेत. कैलास मानसरोवर यात्रा नेपाळ मार्गे सुरू झाली. गेल्या २५ वर्षामध्ये किमान ५ लाख लोकांनी कैलास मानसरोवर परिक्रमा केली आहे. पांडव ज्या मार्गाने स्वर्गाकडे गेले त्याठिकाणची स्वर्गारोहिणी यात्राही आता हळूहळू लोकप्रिय होत आहे. बदरीनाथ मंदिराच्या मागे साधारणपणे ४० किमी अंतराची ही यात्रा आहे. याचबरोबर पं. विश्वनाथशास्त्री पाळंदे गुरूजींच्या अथक प्रयत्नातून गेल्या २५ वर्षामध्ये काशी पंचक्रोशी परिक्रमेचे पुन:र्जीवन झाले. “ घडे काशी, पण न घडे पंचक्रोशी ” अशी संकल्पना घेवून उत्तर प्रदेश सरकारनेही ८० किमीच्या काशी पंचक्रोशी परिक्रमेला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या चार राज्यातील अत्यंत जागृत परंतु अपरिचित दत्त क्षेत्रांना जोडणाऱ्या दत्त परिक्रमेलाही आता लोक गर्दी करू लागले आहेत. अशाच प्रकारे अयोध्या परिक्रमा आणि वृंदावन परिक्रमा विकसित झाली. उत्तराखंडमध्ये रामायणकाळातील गोष्टीचा आधार घेवून हनुमंताने संजीवन वनस्पतीसाठी जो द्रोणगिरी पर्वत उचलून लंकेला नेला होता त्याची द्रोणगिरी परिक्रमा सुरू झाली. कैलास मानसरोवराबरोबरच आदि कैलास, किन्नर कैलास, श्रीखंड कैलास आणि मणि महेश कैलास अशी पंच कैलास, पंच बदरी म्हणजे बदरीनाथ, वृध्द बदरी, योगबदरी, ध्यानबदरी, भविष्य बदरी आणि योगबदरी, पंच केदार म्हणजे केदारनाथ, कल्पेश्वर, रुद्रनाथ, तुंगनाथ, मदमहेश्वर या परिक्रमा लोकप्रिय होत चालल्या आहे. दत्तसंप्रदायातील मानदंड अशी गिरनार गिरीशिखर परिक्रमाही अशीच भाविकांचे आकर्षण बनून राहिली आहे. हिमाचलमध्ये राणीखेत जवळची लाहिरीमहाशय आणि महावतार बाबाजी यांची प्रथम भेट झाली त्या गुहेची परिक्रमा ही परिक्रमासुध्दा आता लोकप्रिय होत चालल्या आहेत. दरवर्षी लाखो भाविक अनवाणी शबरीमलाई यात्रा करतात. टेंपल टुरिझम मध्येही अध्यात्म आणि प्राचिन वास्तू आणि स्थापत्यशास्त्राचा मिलाफ दिसून येतो. हेरिटेज टूर्स म्हणजे प्राचिन भारताचा वारसा सांगणाऱ्या पर्यटनामध्येही आता अनेकदा साहस, कष्ट आणि अध्यात्म यांचा समन्वय झालेला दिसून येतो. अगदी याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी त्र्यंबकेश्वर डोंगराला म्हणजे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त गर्दी करीत आहेत. सज्जनगड प्रदक्षिणा, सिंहगड प्रदक्षिणा, कोकणातील संजीवन समाधी परिक्रमा अशा अनेक परिक्रमा आता सुरू झाल्या आहेत.
अध्यात्मिक साहसी परिक्रमा हा पूर्णपणे वेगळा असा एक नविन ट्रेंड बनत चालला आहे. फक्त देशातूनच नव्हे तर विदेशातूनही लोक आता साहसी अध्यात्मिक परिक्रमांसाठी गर्दी करीत आहेत. विशेषत: यामध्ये युवा पिढी आणि महिलां मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. यामधून मोठ्या प्रमाणावर ग्रामिण भागामध्ये रोजगार संधी निर्माण होत आहेत. गैरसोयी, शहरी सुविधांची वानवा आणि तुलनेने कष्ट्दायक असूनही साहसी अध्यात्मिक परिक्रमांकडे आता पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. एकांतात, निसर्गात मिळणारी एक आगळीवेगळी आणि निखळ आनंददायक अनुभूती त्यांना आकर्षित करीत आहे. भारत आणि इंडिया यांना जोडणाऱ्या या साहसी अध्यात्मिक परिक्रमा ग्रामिण आणि पहाडी भागातील जीवनशैली, भारतीय सभ्यता, नैतिक जीवन, गरिबीतही समाधानी आणि अल्पसंतुष्ट असणऱ्या बांधवांची ओळख नवभारताला करून देत आहेत. संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या अर्थाने समन्वयाचे सोपान घडविणाऱ्या या साहसी अध्यात्मिक परिक्रमांमध्ये प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी सहभागी होवून एक आगळीवेगळी आनंददायी अनुभूती घेतली पाहिजे.
Comments