आयुष्याच्या प्रवासात अनेक चढउतार येत असतात. कधी खूप पैसा असतो, तर कधी अगदी कफल्लक परिस्थिती असते. सगळी सोंग आणता येतात, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही. एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्य़ाचे मूल्यमापन केले असता असे दिसून येईल, की जीवनाच्या एका टप्प्यात खूप पैसा, स्थैर्य, संपत्ती असते, आणि दुसऱ्या टप्प्यावर अत्यंत हलाखीची स्थिती असते. प्रत्येकाच्या जीवनात हे टप्पे असतात. मग तो नोकरी करणारा असो किंवा व्यावसायिक असो. काहीजण म्हणतात, पैसा असेल तरच जगण्याला अर्थ आहे, पैशाने काहीही करता येऊ शकते. या वादात कितीही चर्चा केली तरी सर्वमान्य निष्कर्ष निघणार नाही.
एक गोष्ट मात्र खरी, की पैसा जीवनात आवश्यक आहे. वेळेला तो असणे तर अतिशय आवश्यक आहे.
माणसाचा सगळा संघर्ष पैसा मिळाविण्यासाठी चाललेला असतो. मग तो पुण्या मुंबईसारख्या शहरात राहणारा माणूस असो, किंवा एखाद्या खेड्यात राहणारा. त्यांच्या गरजा विभिन्न असतील, पण दोघांनाही पैशांची गरज आहे. लागणारी रक्कम कमी-जास्त असू शकेल; मात्र गरज आहे हे नक्की ! आजच्या काळामध्ये कदाचित पैसे कमविणे हे सोपे आहे, मात्र पैसे टिकवणे हे अवघड आहे. आपल्याकडे येणारे पैसे यायच्या आधीच जायचे रस्ते नक़्की करुन येतात. जाणारे रस्ते रोखून त्याचे संपत्तीमध्ये रुपांतर करणे ही एक कला आहे. त्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. “ प्रभात अर्थमित्र ”. संपत्ती निर्माण करण्यासाठी नशिबाची गरज नाही किंवा जुगार खेळायची, चोरी करायची, इतरांवर अन्याय करायची आवश्यकता नाही. त्यासाठी आहे “ अर्थभान ”. अर्थभान म्हणजे पैसा, चल अचल संपत्ती आणि आर्थिक बाबींविषयी सतत जागृत असलेली जाणीव. त्यामुळे आर्थिक नियोजन हा जीवनाचा एक अति आवश्यक भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या मिळकतीमधून नियमितपणे आणि शिस्तशीर पद्धतीने बचत करणे, रक़्कम बाजूला काढणे, ती पद्धतशीरपणे गुंतवणे, तिची सुरक्षितता सतत तपासत राहणे, तिची वाढ होईल याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार ती त्वरीत उपलब्ध होईल याची काळजी घेणे इ. अनेक गोष्टींची एकत्रित उपाययोजना म्हणजे अर्थभान किंवा आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनामध्ये बचत, गुतंवणूक, आयुर्विमा, सर्वसाधारण विमा, आरोग्यविमा, निवृत्तीवेतन, चल अचल संपत्ती निर्माण इ. अनेक गोष्टी येतात. आपापल्या वयानुसार, आर्थिक परिस्थितीनुसार, शिक्षण आणि कौशल्यानुसार आपल्याला स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बणवावा लागतो.
एखादी नवीन गोष्ट शिकताना आपल्याला कळत नाही, की नक्की सुरवात कुठून करायची ? गाडी शिकायची असो, किंवा गुंतवणूक करायची असो. गुंतवणूक म्हणजे आपण साठविलेल्या व गुंतविलेल्या पैशातून पुन्हा पैसा निर्माण करावा, मिळवावा; म्हणजेच साठविलेल्या पुंजीची बाहेरून भर न घालता वाढ होईल. शहाणपणाने गुंतवणूक केली तर तिचा उपयोग जीवनातील आर्थिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी होईल. उदा. घर बांधणे, निवृत्तीनंतरचे जीवन, मुलांचे शिक्षण, असे जे कोणते आर्थिक उद्दिष्ट महत्त्वाचे असेल त्यासाठी त्याचा उपयोग होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की पैसे गुंतविण्यासाठी तुम्ही श्रीमंत, धनवान असणे गरजेचे नाही. एक छोटीशी रक्कम दीर्घकाळ गुंतवत ठेवली तर दीर्घकाळात त्यातून मोठ्या संपत्तीची निर्मिती होऊ शकते. उदा. १ हजार रुपये दर महिन्याला आपण ८ टक्के दराने ३० वर्षे गुंतविले, तर १५ लाख रुपयांची राशी तयार होते. आता १ हजार रुपये ही रक्कम अतिशय किरकोळ वाटेल. पण ३० वर्षांचा काळ आणि चक्रवाढव्याजाची, म्हणजे व्याजावरील व्याजाची किमया यामुळे या किरकोळ रकमेतून सुद्धा मोठी राशी निर्माण होऊ शकते. अर्थात यासाठी किती रक्कम आणि कोणत्या कारणासाठी हे ठरविणे संयुक्तिक असते. गुंतवणूक निवृत्तीच्या काळासाठी केली असेल तर तिचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करून चालणार नाही. गुंतवणूक कुठे आणि किती करावी, याचे काही ठोकताळे आहेत.
माणसाच्या जीवनात मोठे खर्च कोणते असतात, याची एक सर्वसाधारण यादी करता येऊ शकेल. त्यातील मुख्य प्रकार म्हणजे तातडीचे व आणीबाणीने खर्च, आणि नैमित्तिक खर्च. तातडीचे व आणीबाणीचे खर्च म्हणजे अपघात, अचानक उद्भवलेले आजारपण, तंटेबखेडे, सहली, तीर्थयात्रा, घरगुती कार्यक्रम इ. या तातडीच्या खर्चाबद्दल आधी काहीच नियोजन करता येत नाही. त्या त्या वेळी परिस्थितीप्रमाणे योग्य आणि आवश्यक असे खर्च करावे लागतात. तातडीच्या खर्चासाठी एकतर काही रक्कम रोख किंवा लगेच रोखीत परिवर्तन करता येण्याजोगी अशी ठेवावी लागते. ती नक्की किती असावी, हे प्रत्येकाने आपल्या अनुमानानेच ठरवावे लागते.
Comments