देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते. मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत. आणि गावागावात एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. तेथील अनुभूती आणि रोकडी प्रचिती यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारुपाला आली आहेत.
परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तीभावाचा एक कृतज्ञतापूर्वक अविष्कार आहे. आपण एखाद्या देवळामध्ये दर्शनाला जातो. देवाच्या मूर्तीजवळ नतमस्तक होतो. त्या देवतेबरोबर आपण मनोभावे संवाद साधतो. मनातील मागणे मागतो. त्यानंतर त्या देवाबद्दलची भक्ती, प्रीती, आदर, कृतज्ञता इ. भावनांचे प्रकटीकरण म्हणून त्या देवतेच्या भोवतीने चहूबाजूंनी प्रदक्षिणा करतो. देवतेची मुर्ती मध्यभागी स्थिर असते. आपण उजवीकडून डावीकडे असे वर्तुळाकार चालत जावून पुन्हा मूर्तीसमोर येवून नमस्कार करतो. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातली जाते त्याप्रमाणे गाईला प्रदक्षिणा घातली जाते. तसेच ग्रामदेवतांना प्रदक्षिणा घातल्या जातात. पालखीमध्ये देव घालून प्रदक्षिणा घातल्या जातात. डोंगराला, पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंग आहे. विनम्रता, कृतज्ञता, श्रद्धा, प्रार्थना, यांचा मनोरम अविष्कार म्हणजे प्रदक्षिणा आहे. ज्याप्रमाणे खेड्यातील महिला तिच्या डोक्यावर एकावर एक पाण्याचे घडे ठेवते आणि पूर्णपणे त्यांच्यावर लक्ष ठेवून तोल सांभाळत सांभाळत चालत असते, त्याप्रमाणे भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण करीत प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा किमान तीन, पाच, सात, अकरा, एकवीस, एक़्कावन्न, त्रेसष्ठ किंवा एकशे आठ अशा घातल्या जातात. प्रदक्षिणेचे फळ शास्त्रामध्ये सांगितले आहे.
यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानि च ।
तानि तानि प्रणश्यन्तु प्रदक्षिणा पदे पदे ॥
या जीवनात आणि जन्म जन्मांतरी कळत न कळत केलेल्या पापांचे क्षालन प्रदक्षिणा घातल्यामुळे होते. मन:पूर्वक, श्रद्धापूर्वक घातलेल्या प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलामुळे हा पापांचा भार हलका होत जातो.
यावरुन असे लक्षात येते की प्रदक्षिणेचा, परिक्रमेचा एक उद्देश पापक्षालन हाही आहे. आपल्या कार्यानुसार मनुष्य सुख दु:ख भोगित असतो. पुण्याचा आणि सत्कर्माचा प्रसाद म्हणून मनुष्य सुख भोगित असतो. मनातील कुविचारांचा त्याग करुन सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात. अर्थात याचबरोबर ऐहिक आणि प्रापंचिक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात. काही वृक्षांच्या प्रदक्षिणा उदा. औदुंबर, पिंपळ, कडुलिंब, इ. या समस्या सोडविण्यासाठी आणि आरोग्यविषयक समस्या दूर करणाऱ्या असतात. जिथे मोठ्या प्रमाणावर तीर्थस्थाने आहेत आणि ज्या स्थानांचे अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे अशा ठिकाणांभोवती केलेल्या प्रदक्षिणा यांना परिक्रमा असे म्हणतात. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, व्रज परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, त्र्यंबक परिक्रमा इ. परिक्रमा आपल्याला माहित आहेत. अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीभावाने या परिक्रमा केल्या जातात. त्यामधून मिळणारी अनुभूती वैयक्तिक शांती, समाधान आणि लाभ मिळवून देणारी असते.
श्रीदत्त परिक्रमा ही एक अशीच परिक्रमा आहे. कलियुगामध्ये सर्वात लाभदायक उन्नती करणारी आणि समस्या निराकरण करणारी देवता म्हणजे श्रीगुरू दत्तात्रेय हे आहेत. केवळ स्मरण केल्याने कोणत्याही उपचारांशिवाय फक्त मन:पूर्वक वंदन केल्यावर प्रसन्न होणारी देवता म्हणजे श्रीदत्तात्रेय हे आहेत. श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्तसंप्रदायिक सत्पुरूष या सर्वांचे वैषिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रिती करतात. त्याला बळ देतात. त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तीमार्गावर पुढे घेवून जातात. श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरु केले आहेत. या २४ गुरुंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे. जगद्गुरु होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. श्रीदत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्त्व चिरंतन आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वाना सामावून घेणारे आहे. त्यांचा समन्वयादी दृष्टीकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक भावनिक, अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी सहाय्यकारी आहे. त्यांचे हे विभूतीमत्त्व अत्यंत प्रत्ययकारी आहे. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तीकेंद्राची प्रतीके आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये २४ शक्तीकेंद्रे असतात. ही शक्तीकेंद्रे जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंग्रहामुळे, साधनेमुळे, सत्कर्मामुळे, सद्गुरु कृपेमुळे जागृत होत असतात.
प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे. “ जे पिण्डी, ते ब्रह्मांडी ” असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात. ही एक प्रक्रिया आहे. त्याची अनुभूती वैयक्तिक आहे. ही केंद्रे जागृत झाल्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते, त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळ्ते, सृष्टीचक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन वाढतो. एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते. जाणिवा आणि नेणिवा यातील यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तीकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे. ज्या ज्या ठिकाणी श्रीदत्त क्षेत्रे आहेत, त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्यशक्ती वास करत असतात असा अनुभव आहे. श्रीदत्तक्षेत्रांठिकाणचे वातावरण, निसर्ग आणि परिसर श्रीदत्त अवतार आणि त्यांच्या शिष्यांच्या तपश्चर्येमुळे, वास्तव्यामुळे आणि लीलांमुळे प्रभावित झालेला आहे. तेथे प्रत्यक्ष गेल्यावर लाखो व्यक्तींना अशा अनुभूती आलेल्या आहेत. श्रीदत्त क्षेत्राच्या ठिकाणी निरंतर कार्यरत असलेली दैवी स्पंदने आणि चैतन्यदायी उर्जा यांचा अनुभव प्रत्येक भाविकाला तेथे गेल्यावर येतो. याचमुळे लाखो लोक सतत अशा तीर्थ क्षेत्रांना भेटी देत असतात.
देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते. मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत. आणि गावागावात एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. तेथील अनुभूती आणि रोकडी प्रचिती यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारुपाला आली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात या ४ राज्यातील अशा २४ दत्तक्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्तपरिक्रमेची सुरूवात पूणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे. त्याचा क्रम खालीलप्रमाणे :
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर पूणे २. लाडाची चिंचोळी ३. औदुंबर ४. कडगंजी ५. बसवकल्याण ६. माणिकनगर ( हुमनाबाद ) ७ . नृसिंहवाडी ०८. गाणगापूर ९. अमरापूर १०. अक़्कलकोट ११. पैजारवाडी १२. लातूर १३. कुडूत्री १४. माहूर १५. माणगाव १६. कारंजा १७. बाळेकुंद्री १८. भालोद १९. मुरगोड २०. नारेश्वर २१. कुरवपूर २२. तिलकवाडा २३. मंथनगुडी २४. गरुडेश्वर
दत्तपरिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, २ ठिकाणे आंध्रप्रदेशातील, ६ ठिकाणे कर्नाटकातील आणि ४ ठिकाणे गुजरात या राज्यातील आहेत. एकूण साधारण ३६०० कि. मी. चा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो. श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरूषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान खालील दत्तावतार आणि दत्त कृपांकित सत्पुरूष यांचे दर्शन आणि अनुभूती घेता येते.
१. श्रीपाद श्रीवल्लभ २. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज
३. श्रीस्वामी समर्थ महाराज ४. श्री माणिकप्रभू महाराज
५. प.पू.श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर ७. चिदंबर दिक्षित स्वामी महाराज
८. प.प. दिक्षित स्वामी महाराज ९. प.पू. गुळवणी महाराज
१०. प.पू. चिले महाराज ११. प.पू. श्रीधर स्वामी
१२. श्री सायंदेव १३. श्री सदानंद दत्त महाराज
१४. प.पू. रंगावधूत महाराज १५. श्रीशंकर महाराज
खरतर गुरुतत्त्व एकच आहे. दत्तप्रभूच सर्वत्र वास करून आहेत. परंतु आपल्या भक्तांना लीला दाखवण्यासाठी, त्यांचे कल्याण करण्यासाठी विविध कालखंडामध्ये विविध रुपाने त्यांनी अवतार घेतला आहे. दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने दत्तप्रभूंच्या कृपेने अक्षरश: न्हाऊन निघाली आहेत. या प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा वावर घडला आहे. त्यांनी त्यांच्या शिष्यांना प्रत्यक्ष दर्शन आणि मार्गदर्शन दिले आहे. हि ठिकाणे विविध राज्यात विविध प्रदेशात आहे. मात्र दत्तकृपेचे आणि दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. या प्रत्येक ठिकाणी दत्तावतारांच्या लीला घडलेल्या आहेत. येथील भाषा, चालीरिती, संस्कृती, खाण्यापिण्याची सवयी वेगवेगळ्या आहेत. तेथील भौगोलिक परिसर, जीवन पद्धती, समाजव्यवस्था भिन्न आहे. मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेली आहेत असे लक्षात येते. समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. “जे जे भेटिले भूत, ते ते मानिजे भगवंत” अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त आहेत. प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “ दत्तोहम ” याचा अर्थ चांगुलपणाचा, देवत्वाचा, सात्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. ज्याप्रमाणे परिसाच्या संगतीत आल्यावर लोखंडाचे सोने बनते, लोखंड उजळून निघते, ते सुवर्णरुप होते. त्याप्रमाणे दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते, साधक सुर्वणरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्तक्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरुन घेवून ती व्यक्ती स्वत:मधील शक्तीकेंद्रे जागृत करित असते. स्वत:च्या एकट्याच्या प्रयत्नाने आणि कर्तृत्वाने या जगात कोणतीही गोष्ट घडणे वा घडविणे शक्य नसते. समाजाच्या सहाय्याने, विविध लोकांच्या सहकार्याने अनेक व्यक्तींना एकत्र घेवून, समन्वय साधून एखादे कार्य घडवावे लागते. मात्र त्याचबरोबर त्याला ईश्वरी सहाय्य देखील लागते. वैश्विक शक्तींनी सहाय्य केल्यावरच महान कार्ये घडू शकतात. ईश्वरी सहाय्य मिळवण्यासाठी सुद्धा नेटाने प्रयत्न करावे लागतात. तपश्चर्या करावी लागते. सत्कर्मे करावी लागतात. आपल्या वैयक्तिक जीवनात दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला अनेकांबरोबर जमवून घ्यायला लागते. आपल्या कुटूंबातील व्यक्ती आपण जिथे नोकरी, व्यवसाय करतो तेथील व्यक्ती समाजातील व्यक्ती यासर्वांबरोबर समन्वय साधावा लागतो. हे सर्व करताना अनेकदा आपली दमछाक होते. “ व्यक्ती तितक्या प्रकृती ” प्रत्येकाचे स्वभाव, वागणे, जीवनपद्धती भिन्न असतात. अनेकदा आपल्या मनाविरुद्ध घडले की निराशा येते. “ सुख जवापडे, दु:ख पर्वताएवढे ” अशी अवस्था होते. अशावेळी मग ईश्वरी शक्तींची जाणीव निर्माण होते. तेव्हा दत्तप्रभूंची, स्वामी समर्थांची आणि एकूणच भगवंत तत्वाची आठवण होते. तीर्थस्थानांना भेटी देवून मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते. श्रीदत्त परिक्रमेदरम्यान असे विलक्षण अनुभव येतात.
श्रीदत्तपरिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सानिध्यामध्ये घालवतो. श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सानिध्यात गेला आहे. कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्यांचा आपल्याला दत्तपरिक्रमे दरम्यान सहावास घडतो. गाणगापूर येथे भीमा अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते. जिच्या नुसत्या दर्शनाने मुक्ती मिळते अशा नर्मदा मातेचे दर्शन झाल्यावर चित्तवृत्ती रोमांचित होतात. तिला पाहू्न आनंद वाटतो. याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान आपल्याला गोदावरी नदीचे दर्शन होते. इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे दर्शन होते. श्रीदत्त परिक्रमेदरम्यान निसर्गाचे मनोहरी दर्शन आपल्याला घडते. श्री दत्त परिक्रमा हा एक वेगळा चैतन्यदायी अनुभव आहे. एकाच वेळी चोवीस दत्त क्षेत्रांना जोडणारी ही परिक्रमा १५ हून अधिक दत्तावतार आणि श्रीदत्तरुपी सत्पुरुषांच्या आणि महाराजांच्या लीलापरिसरांचे आपल्याला दर्शन घडवते. एकाच दत्तप्रभूंचा विविध ठिकाणी होणारा वेगवेगळा अविष्कार, त्यातील एकत्त्व आणि त्यातून दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती हा एक आगळावेगळा चैतन्यसोहळा आहे. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमेबरोबरच श्रीदत्त परिक्रमा हे परिक्रमा विश्वाचे एक अनोखे दालन आहे. नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमेएवढेच श्रीदत्त परिक्रमेचे महात्म्य आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमा यामध्ये कठोर परिश्रम याचबरोबर पायी चालणे हा एक मोठा भाग आहे. अर्थात त्यातही खूप मोठा आनंद आहे. श्रीदत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते. त्यामुळे ही तुलनेने सोपी आहे. शिवाय विविध दत्तक्षेत्रांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अधिक भाविक भक्तांना श्रीदत्त परिक्रमा पूर्ण करून श्री दत्तप्रभूंची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि आपले आयुष्य चैतन्यमय करुन घ्यावे.
Comments