top of page
  • Writer's pictureProf. Kshitij Patukale

गुंतवणूक व भावना यांची गल्लत नको


‘अरे, एकदम खात्रीची पतसंस्था आहे. संचालक माझे मित्र आहेत. मी दोन लाख रुपये गुंतवले आहेत. वीस टक़्के व्याज दर आहे. कोणी देतं का एवढं व्याज आजच्या घडीला ? तूही ठेव एक लाख भर रुपये !’ एक मित्र छातीवर हात ठेऊन सांगत होता. शंभर टक़्के खात्री देत होता. यावर काहीही निर्णय न देता, ‘पाहूया’ असे सांगितल्यावर तो मित्र आठ दिवस हेलपाठे मारत होता. परोपरीने समजावत होता. शेवटी गंतवले पन्नास हजार रुपये ! सहा महिन्यांनी कळलं, की ती पतसंस्था बुडाली ! कपाळावर हात मारुन घेतला आणि आपल्याच मूर्खपणाची कीव करीत बसलो. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण पाहा. कधी नव्हे ते भरपूर अभ्यास करुन, पुस्तके वाचून, तज्ज्ञांशी चर्चा करुन शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले. सहा महिन्यांत मार्केट वाढायला लागले. गुंतवलेल्या पैशावर थोड्याच काळात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता दिसू लागली. तेवढ्यात अचानक शेअर मार्केट कोसळले. काय करावे ते सुचेना. सगळे पैसे बुडतील या भितीने मिळेल त्या किंमतीला सर्व शेअर्स मार्केट स्थिर झाले आणि विकलेल्या शेअर्सचे दर वधारले. भीतीने एकदम सगळे शेअर्स विकल्याचा पश्चाताप झाला. पण हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.


ही दोन प्रातिनिधक उदाहरणे. भीती, धाडस, पश्चाताप, स्वप्न, चिंता, हळहळ अशा अनेक भावनांचा संमिश्र गदारोळ. त्यातून होणारे नुकसान. पण खरेच, असे का घडते ? सोन्याचे दर वाढणार म्हणून लोक धडाधड सोन्याची बिस्कीटे खरेदी करतात आणि मग दर कमी झाले, की नशिबाला दोष देत बसतात. कुणीतरी सांगतं म्हणून कुठेतरी जागा घेतात. त्या जागेत एकाने तीन वर्षांत तिप्पट पैसे मिळवले, आपले दुप्पट तरी होतील, या आशेने घेतलेली जागा विकताना जीव मेटाकुटीला येतो. मोजलेली किंमत सुद्धा मिळत नाही. एम. एल. एम. आणि चेन मार्केटींग यांवरील सेमिनार ऐकून आपले विमान हवेतून जाऊ लागते. आपणच नव्हे, तर आपल्या पुढील चार पिढ्यांना दर महिन्याला लाखो रुपयांचे मिळणारे चेक जणू आत्ताच आपल्या हातात पडले आहेत, अशा थाटात वागायला सुरुवात करतो. मोठमोठ्या हॉटेलांत, पंचतारांकीत वातावरणात, श्रीमंतीच्या पेहरावात आपल्यामध्ये भरलेली ही स्वप्नांची हवा लवकरच ओसरते, आणि मग कुठून हे साबण, टूथपेस्ट आणि शांपू विकायला सुरुवात केली असे होऊन जाते ! आपला उद्योग, व्यवसाय सोडून भावनेच्या भरात फरपटत जाऊन आपण कसे फेरीवाले, विक्रेता बनलो, याचे आश्चर्य वाटू लागते. यात आयुष्याचा अमूल्य वेळ तर वाया जातोच, पण आता बाहेर तोंड दाखवायचीसुद्धा लाज वाटू लागते. प्रचंड निराशा येते. स्वदेशी असो की परदेशी; कोणतीही कल्पना जी अल्पावधीत करोडपती होण्याचे आमिष दाखवते तिचा फुगा लवकरच फुटतो , असा अनुभव आहे. तरी सुद्धा आपली हाव काही सुटत नाही. आपल्याला अडकवण्यासाठी ‘ झुकती है दुनिया, झुकनेवाला चाहिए ’ हे घोषवाक्य घेऊन गळ टाकून बसलेल्यांच्या जाळ्यात आपण पुन:पुन्हा अडकतो. आयुष्यातली सारी मिळकत अशा क्षणिक मोहापायी गमावलेले अनेकजण आपण आपल्याभोवती पाहतो.


गुंतवणूक आणि भावना यांची अजिबात गल्लत करता कामा नये. आकाशातून कधीही पैसे पडणार नाहीत, हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे. गुंतवणूकीकडे अत्यंत व्यावहारीक नजरेने पाहिले पाहिजे. एकदम आशादायी किंवा पूर्णत: निराशादायी दृष्टीने पाहिल्यास नुकसानच होते. अगदी सरळपणे, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता निरपेक्षपणे गुंतवणूकीचे मूल्यांकन व विश्लेषण करता आले पाहिजे. कोणतीही भावना मध्ये न आणता प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे गुंतवणूकविषयक निर्णय घेता आले पाहिजेत. अनेकदा आयुष्याकडे पाहिल्यावर असे दिसून येते की बहुतेक निर्णय आपण बुद्धीला प्राधान्य न देता भावनेच्या भरात घेतले आहेत आणि नंतर पश्चाताप करीत बसलो आहोत. खरे तर, गुंतवणूक करताना हृदयाऐवजी मेंदूचा वापर करणे, भावनावेगापेक्षा विवेकाचा वापर करुन निर्णय घेणे आवश्यक असते. एकतर भरपूर स्वप्नं, उच्च अपेक्षा किंवा एकदम निराशा, भीती अशी मानसिक स्थिती गुंतवणूक करताना बिलकूल उपयोगाची नाही.


वॉरेन बफेट हा प्रसिद्ध गुंतवणूकदार असे म्हणतो, की गुंतवणूकीसाठी मोठी तार्किक बुद्धिमत्ता किंवा माहितीची गरज लागत नाही. भावनांना आवर घालून बुद्धी आणि कॉमन सेन्सचा वापर करण्याची क्षमता हाच आर्थिक यशाचा मार्ग आहे. कितीतरी वेळा खोट्या मिजासीपायी आणि निरर्थक प्रतिष्ठेसाठी आपण नाहक भरमसाट खर्च करतो. खरे तर, त्याची काहीच गरज नसते. पण ‘ अहं ’ च्या भावनेने मोठेपणा मिरवण्यासाठी आपण मूर्खासारखे पैसे खर्च करतो आणि कालांतराने आपलेच हसे करुन घेतो. वाचविलेला पैसा म्हणजे एका अर्थाने मिळवलेला पैसा असतो. पैसा मिळवणे एकवेळ सोपे आहे, मात्र तो राखणे आणि त्यात वाढ करणे हे अवघड आहे. चार पैसे मिळाले, की मी आता टाटा-बिरला ( आणि अंबानीसुद्धा ) यांच्या बरोबरीचा झालो, म्हणून अनेकजण आपली जीवनपद्धती कारण नसताना अति खर्चिक करुन टाकतात. एकदा का हा फुगा फुटला, की मात्र बघण्यासारखी परिस्थिती निर्माण होते.


भावना आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ घालताना पुढील बाबींकडे लक्ष द्यावे-

१. ताज्या व स्फोटक घडामोडींकडे फार लक्ष देऊ नये.

२. एकदम प्रचंड पैसा मिळवून देणाऱ्या बाबींचा पाठलाग शहाण्याने करु नये.

३. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टीने पाहावे. तात्कालिक चढउतारांची फारशी चिंता करु नये.

४. ठराविक काळाने गुंतवणुकीचे नियमित विश्लेषण करावे. तज्ज्ञांशी चर्चा करावी, गरज असल्यास गुंतवणूक बदलावी.

५. अशक्यप्राय कल्पनांमध्ये वाहून जाऊन गुंतवणूक करु नये. एकदम लाखो रुपये मिळवून देणाऱ्या साखळी योजनांमध्ये फसू नये.

६. गुंतवणूक ही कला आहे, तिचा नशिबाशी काही संबंध नाही. त्यामुळे कला व नशीब यांची गल्लत करु नये.

७. कुणीतरी सांगतं म्हणून डोळे झाकून गुंतवणूक करु नये. गुंतवणुकीआधी सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात.


याचा अर्थ असा नव्हे, की गुंतवणूक करु नये किंवा कोठेही धोके असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवू नयेत. प्रत्येक वेळी सर्व अभ्यास करुन विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भावनांवर स्वार होऊन गुंतवणूक न करता, भावनांना लगाम घालून गुंतवणूक केल्यास अनेक संभाव्य धोके व अपयशांच्या शक्यता कमी करता येतील. चांगल्या गुंतवणुकींमुळे चांगल्या भावनांचा आनंद दीर्घकाळ घेता येईल.

141 views0 comments

Comments


bottom of page