
केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजना राबविण्याचा सन्मान भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल. आय. सी. ला दिला गेला आहे. वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतीच प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन यॊजना सादर केली आहे. ही योजना प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन यॊजना ही एक पेन्शन पॉलिसी आहे. वाढते वैद्यकीय आणि इतर खर्च आणि घसरत जाणारे ठेवींवरील व्याजाचे दर याची चिंता वरिष्ठ नागरिकांना सतत भेडसावत असते. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन यॊजना ही एक उत्तम यॊजना आहे. या योजनेचा कालावधी दहा वर्षाचा असून पेन्शन सुरु झाल्यापासून पुढील दहा वर्षे स्थिर म्हणजे एकाच निर्धारित दराने पेन्शन मिळणार आहे. पेन्शन दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वर्षांतून एकदा अशा कोणत्याही एका प्रकाराने मिळेल. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजनेमध्ये सुरुवातीला भरलेली सर्व रक्कम परत मिळेल. या योजनेमध्ये पेंन्शनची रक्कम कमीत-कमी रुपये १०००/- आणि जास्तीत-जास्त रुपये ५०००/- एवढी निवडता येते. एकाच कुटुंबामध्ये पती-पत्नी दोघांचेही वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल तर दोघांना मिळून एकत्रित रु ५०००/- एवढ्या मर्यादेपर्यंतच प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये सहभागी होता येते. किमान आणि कमाल पेन्शन मर्यादा खालील प्रमाणे आहे.
अ] कमीत-कमी पेन्शन
दरमहा रु १०००/- तिमाही रु ३०००/- सहामाही रु ६०००/- वर्षातून एकदा रु १२०००/-
ब] जास्तीत-जास्त पेन्शन
दरमहा रु ५०००/- तिमाही रु १५०००/- सहामाही रु ३००००/- वर्षातून एकदा रु ६००००/-
किमान आणि कमाल पेंन्शनसाठी गुंतवावी लागणारी रक्कम खालील प्रमाणे
पेन्शन कशी मिळणार किमान रक्कम कमाल रक्कम
१] दरमहा १,५०,०००/- ७,५०,०००/-
२] तीन महिन्यातून एकदा १,४९,०६८/- ७,४५,३४२/-
३] सहा महिन्यातून एकदा १,४७,६०१/- ७,३८,००७/-
४] वर्षातून एकदा १,४४,५७८/- ७,२२,८९२/-
प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये मिळणारी पेन्शन पॉलिसीधारकाच्या आधार कार्डाने जोडलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. योजनेमध्ये पॆसे भरल्यावर लगेच पेन्शन मिळायला सुरुवात होईल. तीन वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेवर ७५% पर्यंत कर्जही मिळू शकेल तसेच पॉलिसीधारक किंवा त्याच्या पती / पत्नीला एखादा असाध्य आजार किंवा गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवल्यास या योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या ९८% पर्यंत रक्कम सरेंडर व्हॅल्य़ू म्हणून मिळू शकते. कर्ज आणि सरेंडर व्हॅल्य़ू ही प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेचे अनोखे वैशिष्ट्य आहेत. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शन रुपी व्याजाचा दर वार्षिक पेन्शन पर्यायामध्ये ८.३% आणि दरमहा मिळणारऱ्या पेन्शन पर्यायामध्ये ८% एवढा आहे. शिवाय तो पुढील दहा वर्षे बदलणार नाही. बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये ठेवींवरील व्याजदर झपाट्याने कमी होत असताना या योजनेमध्ये मिळणारा पेन्शन व्याजाचा दर आकर्षक आहे. दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यावर गुंतवलेली सर्व रक्कम वारसांना परत मिळेल. प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये एल. आय. सी. च्या विमा एजंटबरोबर किंवा डायरेक्ट एल. आय.सी. कार्यालयामध्ये जाऊन या योजनेमध्ये सहभागी होता येईल. तसेच ऑनलाईनही सहभागी होता येईल. या योजनेमध्ये मिळणाऱ्या पेन्शन किंवा परत मिळणाऱ्या रकमेवर कोणतीही कर सवलत मिळणार नाही.
केंद्र सरकारने ४ मे २०१७ रोजी ज्येष्ठ नागरीकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजना ही एक उत्तम योजना सादर केली आहे. दहा वर्षांसाठी स्थिर व्याज दर, कर्ज मिळण्याची सुविधा आणि सरेंडर व्हॅल्य़ू ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजना ही एक विशेष योजना असून ती एक वर्ष म्हणजे ३ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्येष्ठ नागरीकांनी तर या योजनेमध्ये सहभागी व्हावेच. त्याबरोबरच प्रत्येक कमावत्या व्यक्तीने आपले आई वडील, सासू सासरे, आत्या, काका, मावशी, मामा आणि अन्य नातेवाईक आणि गरजू जेष्ठ नागरीकांना प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये पेन्शन खात्याची भेट द्यावी. तसेच आपल्या ६० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या शेतकरी नातेवाईकांसाठी प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये खाते उघडावे. परदेशातील भारतीय नागरीकही प्रधानमंत्री वय-वंदना पेन्शन योजनेमध्ये आपले आई वडील, नातेवाईक आणि गरजू व्यक्तींसाठी हे पेन्शन योजना खाते काढू शकतील. अर्थात कमाल पेंन्शनची रु पाच हजार ही रक्कम फारच तुटपुंजी आहे. ती दहा हजार रुपये तरी असायला हवी होती. तसेच योजनेचा कालावधी किमान २० वर्षे तरी आवश्यक आहे असे वाटते. अधिक माहितीसाठी http://www.licindia.in/Products/Pension-Plans/Pradhan-Mantri-Vaya-Vandana-Yojana या लिंकला भेट द्यावी. किंवा आपल्या नजिकच्या एल. आय.सी. एजंटकडे किंवा एल. आय.सी. कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी.
コメント