कुटुंब आणि पालक हे संस्कृतीचे आणि परंपरेचे आधारस्तंभ आहेत. भविष्यातील भावी पिढीचे सुकाणू सुजाण, समर्थ आणि सक्षम पालकांच्या हातात आहे. त्यामुळे संपन्न आणि संस्कारक्षम अशा भावी पिढीसाठी पालकत्व विकसित करणे ही काळाची गरज आहे. पालकत्व म्हणजे नक्की काय हे त्यासाठी समजून घेतले पाहिजे. मुलांना जन्माला घालणे आणि त्यांचे पालन पोषण करणे हेच फक्त पालकांचे कर्तव्य आहे, ही समजूत फारशी बरोबर नाही. हे काम तर पशूपक्षीही करतात. आपल्या पिलांना लहानपणी खाण्यापिण्यासाठीच्या वस्तू आणून देण्याचे काम तेही करतात. पिलांना पंख फुटले, ती स्वबळावर उडू लागली, शिकार करू लागली की पशू पक्षी पिलांपासून दूर होतात आणि त्यांना त्यांचे अवकाश उपलब्ध करून देतात. पशू पक्षी त्यांच्या पिलांना पुरेसे सक्षम होईपर्यंत सहाय्य करतात आणि नंतर त्यांना पूर्णत: स्वातंत्र्य बहाल करतात. माणूस हा पशूपक्ष्यांहून नक्कीच वेगळा प्राणी आहे. माणसाचे व्यक्तीमत्व विशेष प्रकारचे आहे. नैसर्गिक संवेदनांहून काही अधिकीच्या संवेदना, भावना आणि क्षमता माणसाकडे आहेत. माणसाला मन आणि बुद्धी या विशेष शक्ती प्राप्त आहेत. त्यामुळे तो चिंतन, मनन आणि कृती करू शकतो. आपल्या जीवनाचा आराखडा त्याला बनविता येतो. भुतकाळाचा अभ्यास करण्याचे आणि भविष्यकाळाचा वेध घेण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे पशूपक्ष्यांपेक्षा एका वेगळ्या पातळीवर आणि उच्च श्रेणीवर तो आपले जीवन जगत असतो. हेच मानवाचे विशेष आहे. केवळ मुलांना जन्माला घालणे हेच फक्त माणसाचे काम नसून त्यांचे सक्षम, सुस्कांरीत आणि उत्तम व्यक्तीमत्वामध्ये रूपांतर करणे हे जन्मदात्यांचे काम आहे. त्या अनुषंगाने पालकत्व म्हणजे नक्की काय ते समजून घेणे आवश्यक आहे.
पालकत्व ही एक व्यापक संकल्पना आहे. भावी पिढीच्या निर्मिती ही सुजाण पालकत्वाशी निगडीत आहे. पालकत्व ही एक सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे. पालकत्व ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया यांत्रिक नसून अनेक स्तरांवर चालणारी आणि विविध प्रकारच्या क्षमतांचे परिपोषण करणारी प्रक्रिया आहे. मुलांच्या पालन पोषणाबरोबरच त्यांचा शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक विकास घडवून आणण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न करणे, त्यासाठी अनुकूल वातावरण व संधी निर्माण करणे आणि त्यासाठी सतत उत्तेजन देत राहणे ही सुजाण पालकत्वाची व्याख्या आहे. सुजाण पालकत्वामध्ये मुलांच्या सर्व प्रकारच्या क्षमता फुलविणे आणि त्या विकसित करण्याच्य़ा प्रेरणा आणि संधी देणे हे अनुस्यूत आहे. खरतर पालक, शिक्षक आणि एकूण समाज हा मुलांसाठी मार्गदर्शक आणि हितचिंतकाच्या भूमिकेमध्ये असतो. ज्याप्रमाणे एका मोठ्या पाषाणामध्ये एखादी सूंदर मूर्ती आधीपासूनच विराजमान असते. शिल्पकार छिन्नी आणि हातोड्याने आजूबाजूची आवरणे बाजूला काढतो आणि त्यातून एक विलोभनीय मूर्ती प्रत्यक्षामध्ये वास्तवात साकारते. अगदी तसेच मुलांमधिल व्यक्तिमत्वाला वास्तव रूप देण्याचे काम पालकत्व या प्रक्रियेमध्ये अपेक्षित आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले आहेत की Education is the manifestation of perfection already existing in human being. त्यामुळे पालकत्व ही मुलांमधिल अत्यंत सुंदर आणि चैतन्यदायी व्यक्तीमत्वाला प्रत्यक्षात प्रकट होण्यासाठी सहाय्य करणारी व्यवस्था मात्र आहे. असे म्हणतात की लहान मुले हि लोण्याच्या गॊळ्याप्रमाणे असतात. त्यांना आपण जसा आकार देवू तशी ती घडतात. त्यांना सुयोग्य, मंगलमय आणि सुनियोजित आकार देणे हे पालकत्वाच्या प्रक्रियेचे महत्वाचे अंग आहे.
पालकत्व आणि कुटुंबव्यवस्था यामध्ये एक जैविक आंतरसंबंध आहे. एकत्रित कुटूंबव्यवस्थेमध्ये सुजाण पालकत्वाची प्रक्रिया नैसर्गिक रितीने अंतर्भूत केली गेली होती. त्यामुळे त्यामध्ये प्रत्येक मुलाची काळजी, संगोपन, संस्कार आणि त्याच्या व्यक्तीमत्वाच्या निर्मितीची प्रक्रिया हि सहज आणि नैसर्गिक पद्धतीने होत होती. त्यासाठी वेगळ्या आणि विशेष यंत्रणेची आवश्यकता नव्हती. अर्थात यामध्ये समाजाचे फार मोठे योगदान होते. संपूर्ण समाजच एका अर्थाने अत्यंत जागृत आणि परस्परसंबंधाने बद्ध होता. दैनंदिन जीवन आणि सामाजिक जीवन एकत्रितरित्या गुंफलेले होते. परस्पर नाते संबंध, व्यवसाय संबंध, सांस्कृतिक संबंध, सामाजिक संबंध अशा विविध अंगांनी संपूर्ण समाज परस्परावलंबी होता. त्यामुळे त्यामध्ये एक नित्य जिवंत संवाद होता. तो जिवंत संवाद फक्त मुलांच्याच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या पालकत्वाची काळजी घेत होता. औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाच्या यंत्रणा सतराव्या अठराव्या शतकामध्ये गतिमान झाल्यानंतर संपूर्ण जगभर उलथापालथ झाली. एकत्र कुटुंब व्यवस्था कोलमडून पडू लागली. सामाजिक बंध आणि संबंध तुटून पडू लागले. विभक्त कुटुंबपद्धतीचा उदय झाला. आतातर न्युक्लियर फॅमिली – ध्रुविय कुटुंबपद्धती सर्वत्र फोफावू लागली आणि सुजाण पालकत्वाची गंभीर चर्चा सुरू झाली. त्यातून पालकत्व हा एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण विषय म्हणून आकाराला येवू लागला आहे.पालकत्त्व या विषयाचा विचार करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सध्याच्या काळात कुटुंबामध्ये असलेली मुलांची संख्या. पूर्वी जितकी मुले जास्त तितकी त्या व्यक्तीला जास्त प्रतिष्ठा असे. त्यामुळे मुलांना जन्माला घालणे ही एक सहज प्रवृत्ती आणि नैसर्गिक बाब असे. परंतु आता एक किंवा दोनच मुले असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यात आपण कुठे कमी पडू नये अशी भावना अधिक उत्कटतेने असते. त्यातूनच सुजाण पालकत्त्व असा विषय समोर आला आहे. याचा अर्थ भूतकालातील हजारो वर्षे पालक सुजाण नव्हते, त्यांना आपल्या मुलांविषयी, भावी पिढीविषयी प्रेम नव्हते असे अजिबात नाही. त्यांनीही त्या दिशेने सतत अधिकाधिक प्रयत्न केले. मात्र सध्याच्या काळात हे प्रयत्न वैयक्तिक पातळीवर अधिक करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे धृविय कुंटुंब व्यवस्था, विकास आणि सततची असुरक्षितता. त्यामुळे आपले आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष झाले तर काय होईल अशी काळजी सतत वाटत राहते. असे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक प्रकारचे सामाजिक प्रमाद घडत असल्याचेही आपण सध्या पहात आहोत. त्यामुळे आपल्या पाल्याची काळजी घेण्याची आणि त्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष देण्याची अभूतपूर्व गरज निर्माण झाली आहे. आता आपण सुजाण पालकत्त्वाकडे वळू या.
सुजाण पालकत्त्व म्हणजे काय ? आपल्या मुलाचे सर्व प्रकारचे भरण, पोषण आणि विकसन करण्याची प्रक्रीया म्हणजे सुजाण पालकत्त्व होय. मुलाच्या जन्मानंतरची पहिली काही वर्षे शारिरीक दृष्ट्या महत्त्वाची असतात. त्यानंतर त्याची शारिरीक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढ होत जाते. सुरुवातीला फक्त आई, नंतर आई वडील आणि कुंटुंबातील सदस्य, त्यानंतर नातेवाईक, बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यकिक शाळा, महाविद्यालय असा त्याचा पाया विकसित होत राहतो. यादरम्यान विविध पातळ्यांवर त्याचे विकसन होत असते. त्या प्रत्येक पातळीवर त्याला सहाय्य करणे हे सुजाण पालकत्त्वाचे महत्त्वाचे कार्य आहे. मुल जन्मल्यापाशून ते सक्षम होईपर्यंत आणि त्यानंतर ते त्याच्या जीवनामध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत त्याला सर्वतोपरी सहाय्य करणे म्हणजे सुजाण पालकत्त्व. ढोबळमानाने आपण असे म्हणू शकतो की आत्ताच्या काळामध्ये मूल साधारणपणे २५ वर्षांचे होईपर्यंत त्याची काळजी घेणे, त्याला सक्षम करीत राहणे आणि त्याला मार्गदर्शन करीत राहणे म्हणजे सुजाण पालकत्त्व. ही वयोमर्यादा कदाचित काही वेळेला १८ ते २०वर्षांपर्यंत असू शकेल किंवा अगदी ३० वर्षांपर्यंत सुद्धा वाढू शकेल. मुलांच्या विकसनातील टप्पे आणि स्तर खालीलप्रमाणे असू शकतात.
अ) विकसनाचे स्तर
१) शारिरीक : यातील पहिली ३ वर्षे फार महत्त्वाची असतात. मूल सर्वसाधारण मुलासारखे आहे याची खात्री होणे आणि सर्व प्रकारच्या संसर्गजन्य आणि इतर आघातांपासून त्याचे रक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. त्यानंतरही मुलाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, त्याची दिनचर्या आखून देणे. व्यायामांची आणि शारिरीक कष्टांची ओळख करुन देणे. तसेच विविध प्रकारचे मैदानी खेळ, योगासने, पदयात्रा, गिर्यारोहण, साहसी खेळ यांची मुलांना विविध टप्प्यांवर ओळख करुन देणे इ.
२) बौद्धिक : मुलांमधील बौद्धिक क्षमता विकसित करणे. त्या क्षमतांची जाणीव आणि ओळख निर्माण करणे. त्यासाठी कुतुहल जागविणे. शोधक वृत्ती जोपासणे गरजेचे आहे. याचबरोबर स्मरणशक्तीची उपासना करणे गरजेचे आहे. मुलांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देणे. त्यांना विविध प्रकारची माहिती देणे. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतील अशा गोष्टी ज्यांना माहित आहेत त्यांचे बरोबर संवाद करुन देणे. मुलांना विचार करायची सवय लावणे. बौद्धिक खेळांची ओळख करुन देणे, पुस्तक वाचनाची सवय लावणे आणि वाचनाची गोडी लावणे. तर्क करायला शिकवणे. विश्लेषण करायला शिकवणे. अनोळखी समूहामध्ये मिसळण्यासाठी उद्युक्त करणे. विविध प्रकारचे अनुभव घेण्यासाठी प्रेरीत करणे. चर्चा करणे आणि वादविवाद करणे, मुद्देसूद विचार आणि चर्चा करणे यासाठी प्रोत्साहन देणे इ.
३) मानसिक : मुलांना “ मन म्हणजे काय आणि मन कसे कार्य करते ” याची माहिती देणे. मनात विचार कसे निर्माण होतात त्यासंबंधी माहिती देणे. विचार कसे करावेत. अनुभव कसे मिळवावेत आणि मनामध्ये उमटवणारे तरंग आणि प्रतिक्रिया यांची ओळख करुन देणे. राग, संताप, क्रोध कसे निर्माण होतात. द्वेष, मत्सर, लोभ, क्रोध आणि अहंकार यांची ओळख करून देणे. दु:ख, निराशा, अपमान यांची ओळख करुन देणे. मनाचे संतुलन म्हणजे काय आणि ते कसे राखायचे याबाबत संस्कार करणे, इ.
४) भावनिक : मनामध्ये विविध प्रकारचे तरंग उमटत असतात. त्यातून भावना तयार होत असतात. भावनिक पोषण ही मानवाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या भावना फुलविणे, त्यांचे संगोपन करणे, त्या समृद्ध करणे आणि त्यांचे संतुलन करणे याविषयी मुलांना मार्गदर्शन करावे. मन आणि बुद्धी हे भावना आणि विचार यांचे उगमस्थान आहे. त्यांचे संतुलन साधणे. भावना आणि विचार दोन्ही जीवनासाठी आवश्यक आहेत. मात्र त्यांची सीमारेषा कशी ठरवायची याविषयी प्रबोधन करणे. भावना प्रकट करण्याचे तंत्र समजावणे. भावनांचा निचरा करणे आणि योग्य व्यक्तींना भावना आणि विचार सांगणे. त्याच्यबरोबर विचारांची देवाण घेवाण करणे. उच्च आणि उदात्त भावनांची ओळख करून देणे आणि त्यांचा अंगिकार करण्याबाबत मार्गदर्शन करणे.
५) अध्यात्मिक : आपला जन्म का झाला आहे ? जन्म मरणाच्या संकल्पना हे विश्व कुणी निर्माण केले आहे ? या विश्वाचे कार्य कसे चालते ? नैतिकता आणि निती नियम म्हणजे काय ? देव, धर्म आणि उपासना म्हणजे काय ? जीवनाचे ध्येय कसे ठरवायचे ? प्राचीन धर्म ग्रंथांची आणि तत्वज्ञानांची ओळख करुन देणे. जीवनमूल्यांची ओळख करून देणे. समाज जीवन आणि निसर्ग याबाबत माहिती करुन देणे. अनेक अनुत्तरीत प्रश्नांची ओळख करुन देणे. वैश्विक शक्तींची ओळख करुन देणे. ध्यान धारणा, स्वसंवाद, आतला आवाज इ. संकल्पना समजावून सांगणे इ.
याशिवायही काही स्तर असू शकतील जसे की कौशल्याची ओळख, आर्थिक व्यवहारांची ओळख, सामाजिक मूल्यांची ओळख इ. याचबरोबर एकूणच व्यवस्थेची ओळख करुन देणे. प्रत्येक मुलाचा खालील विविध प्रकारच्या अस्तित्त्वांची ओळख करुन दिली पाहिजे.
ब) अस्तित्वांची ओळख
१) स्व-अस्तित्त्व : मी म्हणजे स्वत: या जाणीवेची ओळख करुन दिली पाहिजे. शरीर कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, चित्त इ. संकल्पना शिकविल्या पाहिजेत. फक्त अवयवांची आणि इंद्रियांची ओळख इथपर्यंत मर्यादित न राहता डोळे मिटल्यावर आपल्या “स्व विषयी” जाणीव कशी समजून घ्यायची आणि ती कशी विकसित करायची याबाबत मार्गदर्शन करणे.
२) कुटूंब म्हणून अस्तित्व :- आई, वडिल, बहिण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, आतोबा, मामा, मामी, इ. कुटूंब व्यवस्थेची ओळख करून देणे.
३) समाज म्हणून अस्तित्व :- आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर, त्यात राहणारी माणसे, त्यांचे विविध प्रकार, विविध व्यवसाय, त्यांची जीवन पद्धती, संस्कृती, सण, समारंभ, उत्सव, इ. ची ओळख करून देणे.
४) देश – राष्ट्र म्हणून अस्तित्व :- देश आणि राष्ट्राच्या संकल्पना, विविधता, एकता आणि माणसांना एकत्र करणारी सूत्रे, तसेच विभक्त करणारी सूत्रे, इतिहास, साहित्य, परंपरा, भूगोल, भौगोलिक विविधता आणि भिन्नता, इ. ची ओळख करून देणे.
५) वैश्विक अस्तित्व :- संपूर्ण विश्व, त्यातील आपले अस्तित्व, पशू, पक्षी, प्राणी, ब्रह्मांड, आकाशगंगा, खगोलशास्त्र, इ. अंगानी संपूर्ण विश्वाची ओळख करून देणे.
क ) सुजाण पालकत्वाचे टप्पे
पहिला टप्पा - वय वर्षे ० ते ६ :- अत्यंत महत्त्वाचा काळ, यामध्ये मुख्यत: शारिरीक काळजी, विविध प्रतिबंधक लसी टोचणे, चालणे-बोलणे शिकविणे, इ. गर्भसंस्कारापासून सरस्वती संस्कारापर्यंत म्हणजे पहिलीमध्ये जाईपर्यंतचा टप्पा. पालकत्वाची सर्वाधिक जबाबदारी आई, वडिल आणि कुटूंबातील अन्य सदस्यांवर असते.
दुसरा टप्पा - वय वर्षे ७ ते १२ :- प्राथमिक शिक्षणाचा टप्पा. यामध्ये शारिरीक काळजीबरोबरच बौद्धिक, मानसिक विकसन आणि अनुभवांचे विस्तारीकरण होते. कुटुंबाबरोबरच समाजातील इतर घटकांचेही योगदान
तिसरा टप्पा - वय वर्षे १३ ते १८ :- पौगंडावस्था आणि एकंदरीत व्यक्तिमत्व तयार होण्याचा काळ. याकाळात हळूवारपणे, नाजूकपणे आणि तितक्याच समंजसपणे मुलांना हाताळावे लागते. शरीरामध्ये होणारे बदल समजावून सांगणे, लैंगिक शिक्षण देणे, याकाळात मुलांबरोबर अधिकाधिक संवादी राहणे आवश्यक असते.
चौथा टप्पा - वय वर्षे १९ ते २४ :- याकाळामध्ये विकसित व्यक्तिमत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू असते. अशावेळी मैत्रीपूर्ण संवाद आणि संगोपन गरजेचे आहे. आत्मविश्वास, मानसिक आणि भावनिक आधार, त्याचबरोबर निर्भयता, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
सुजाण पालकत्वाच्या दिशेने विविध स्तर आणि टप्पे आपण पाहिले. सुजाण पालकत्व हा खरतर एक फार मोठा आणि विस्तृत आवाका असलेला विषय आहे. एका लेखामध्ये त्याचे व्यापकत्व बंदिस्त करणे अवघड आहे. सुजाण पालकत्वाच्या दिशेने प्रवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र पालकांनी नीट समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्या सतत लक्षात ठेवल्या पाहिजेत.
१) आपण मुलाला जन्म दिला आहे म्हणजे फार मोठा भीम पराक्रम गाजविला आहे. आपण स्वत: आणि आपले मुल म्हणजे विशेष काही तरी निर्मिती आहे, अशा समजूतीमध्ये राहता कामा नये. मुले जन्माला घालणे हि एक सहज आणि नैसर्गिक बाब आहे. त्यात विशेष पराक्रम असा काहीही नाही. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच माझेही मुल आहे. त्याच्या क्षमता, उपलब्ध परिस्थिती आणि साधनांनुसार तो आपसूक प्रगती करेल, असा विश्वास बाळगावा.
२) आपण मुलाला जन्म दिला आहे म्हणजे आपण त्याचे मालक आहोत. मुलाचे बरे वाईट, हित अहित आणि भविष्य फक्त आपल्यालाच कळते. मी सांगतो अगदी तसेच मुलाचे सर्व काही झाले पाहिजे किंवा मी सांगतो तसेच मुलाने वागले पाहिजे. मी सांगतो तितका वेळ अभ्यास केला पाहिजे. मी सांगतो तितका वेळ खेळले पाहिजे. मी सांगतो तितके मार्क त्याला मिळालेच पाहिजेत, असा मालकी हक्क मुलांवर आणि कुटुंबातील कुणावरही गाजवू नये.
३) मुलांकडून अपेक्षा ठेवाव्यात. पण त्याचे ओझे सतत त्यांच्यावर लादू नये आणि आपल्यावरही घेवू नये. मुलांवर सतत ताण येईल अशा आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नयेत. याचा अर्थ असा नाही त्यांना अतिशय मुक्त आणि विसंवादी बनवावे.
४) मुलांना सुविधा नक्की द्याव्यात. पण सुविधा हा त्यांचा हट्ट आणि अधिकार बनू देवू नये. आपल्या ऎपतीप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे सहज शक्य सुविधा त्यांना द्याव्यात. त्यांना तुलना करायची सवय लागता कामा नये याची काळजी घ्यावी. इतरांकडे आहे म्हणून कर्ज काढून आणि आपली उपासमार करून मुलांना सुविधा देवू नयेत. केवळ दिखावा आणि भ्रामक प्रतिष्ठेच्या मागे आपण जावू नये आणि मुलांनाही जावू देवू नये.
५) आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, अडचणी, समस्या, कौटुंबिक बाबी, सामाजिक संदर्भ इ. बद्दलचे संवाद मोकळेपणाने मुलांसमोर करावेत. त्यांना जरी कळत नसले तरी आपण या कुटूंबाचे एक भाग आहोत, ही जाणिव त्यांच्यामध्ये निर्माण होते. कुटुंबातील आणि जीवनातील संकटे, सुख-दु:खे, अडीअडचणी मुलांनाही कळली पाहिजेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, भावनाविश्व आणि प्रगल्भता वाढायला मदत होते.
६) आम्ही खुप दु:ख भोगले आहे. मात्र आमच्या मुलाला यातल काही भोगायला लागू नये असा अट्टाहास करू नये. मुलांना सूख द्यावे. पण त्यांना फार डोक्यावर बसवून ठेवू नये. अशा मुर्ख कल्पनांमूळे वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, हे लक्षात ठेवावे.
७) मुलांना कुठल्याही गोष्टीला लगेच हो म्हणू नये. त्यांना नकाराची सवय लावावी. विरूद्ध विचार सहन करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये तयार झाली पाहिजे.
८) नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा आग्रह धरला पाहिजे. प्रसंगी सक्ती करावी. चांगल्या आणि हितकारक गोष्टी आत्मसात करण्यासाठी परिश्रम करावे लागतात. वाईट गोष्टी चटकन आपल्याशा करून घेतात. अशावेळी संयम आणि निग्रहाने वागणे आवश्यक आहे.
९) सुजाण पालकत्व म्हणजे सर्वकाही मुलांच्या मनासारखे वागायचे, नेहमी त्यांच्याच कलाने घ्यायचे, त्यांचे मन दूखवायचे नाही असे नाजूक आणि नाटकी वागू नये. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना त्यांना सर्व प्रकारच्या प्रसंगांचा सामना करण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे. बाहेरच्या जगात मुलांना एकट्यालाच तोंड द्यावे लागणार आहे. तिथे तूम्ही बरोबर असणार नाही हे लक्षात ठेवावे.
पन्नास वर्षापूर्वी वडिल लांबून येताना जरी दिसले तरी मुले चिडीचूप होवून जायची. घरातले वातावरण अत्यंत गंभीर होवून जायचे. आज वडील आल्यावर मुलगा त्यांच्या खांद्यावर हात टाकून विचारतो, “ काय रे बाबा, कुठे जायचे जेवायला आणि आज काय प्यायचे!” दोन्ही गोष्टी एकदम टोकाच्या आहेत. मॉडर्न होणे म्हणजे मुलांबरोबर एकेरीमध्ये बोलणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांना आपल्या आईवडिलांबद्दल आदर असलाच पाहिजे आणि त्यांनी पालकांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. नाहीतर अती सुजाण पालकांची अवस्था उत्तरवयात डस्टबीन म्हणजे कचऱ्याच्या डब्यासारखी होते हे नीट लक्षात ठेवले पाहिजे.
सुजाण पालकत्त्वाचा प्रवास सक्षम आणि समर्थ पालकत्त्वाकडे झाला पाहिजे. मुलांची जडणघडण, पालनपोषण आणि विकास करताना आपल्या स्वत:च्या समर्थ आणि सक्षम आयुष्याकडेही वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. स्वत:चे आरोग्य, करिअर आणि आर्थिक नियोजन यांचे कडेही लक्ष दिले पाहिजे. विशेषत: निवृत्ती नंतरच्या जीवनाकडचा विचारही सक्षम पालकत्त्वाबरोबरच समांतर रितीने विकसित केला पाहिजे. पालकत्त्वाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना भावना आणि बुद्धी यांची गल्लत होवू देता कामा नये. मुलांना सक्षम बनवावे, त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्यासाठी सुखसोयी उपलब्ध कराव्यात, विविध प्रकारच्या संधी त्यांना मिळवून द्याव्यात. मात्र त्याचबरोबर त्यांना बाहेरच्या जगाचीही ओळख झाली पाहिजे. जगातील सुख-दु:खांची त्यांना जाणीव झाली पाहिजे. त्यांच्यावर आपण जणू सतत उपकारच करत आहोत असा अविर्भाव नक़्कीच नको. पण एकदम त्यांच्या पूर्णत: आहारी जाणेही योग्य नाही. पालकत्त्वाचा प्रवास हा एक कौशल्यपूर्ण प्रवास आहे. ती एक कला आहे आणि शास्त्रही आहे. तुमच्या अति दबावाने त्यांना भित्रे बनवता कामा नये आणि त्याच वेळी तुमच्या अतीप्रेमाने त्याला अपंगही बनविता कामा नये. मुलांना शारिरीक, मानसिक दृष्ट्या सुदृढ, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिक दृष्ट्या समर्थ बनविले पाहिजे. शेवटी प्रत्येक मूल हे त्याच्या नशिबाने जन्माला आले आहे. त्याच्या मार्गावर ते पुढे जाणार आहे. आपण त्याचे फक्त सहकारी आहोत. ज्याप्रमाणे आपल्या आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला आणि अद्भुत अशा जीवन संग्रामाची ओळख करुन दिली. अगदी तसेच आपल्याला आपल्या मुलाला सक्षम आणि समर्थ बनवायचे आहे. आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद बनत नसतं. त्याप्रमाणे आपल्या मुलाला जीवनाच्या मैदानात उतरवण्यासाठी सुयोग्य आणि सक्षम बनवणे हेच सुजाण पालकत्त्वाचे लक्षण असले पाहिजे. आपणा प्रत्येकाने सुजाण, सक्षम आणि समर्थ पालक बनावे अशा शुभेच्छा.
コメント