गुंतवणूकीचे आधुनिक तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षात पूर्णत: बदलले आहे. त्याने आपले जीवन पूर्णत: व्यापून टाकले आहे. अर्थविषयक विचारांनी आपल्या जीवनशैलीवर एवढा कब्जा केला आहे की तिथे घडणा-या घटनांनी आपले दैनंदिन जीवनही हेलकावे खावू लागले आहे. खरतर अधिक मिळणारा पैसा निरपेक्षपणे समाजाला विविध मार्गांनी परत करणे अपेक्षित असते. संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. "मिळवून धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी". आज मात्र पैसा आणि संसाधने गोळा करण्याचे इतके विविध मार्ग उपलब्ध झाले आहेत की जणूकाही पैसे मिळवण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगणकीय आणि संवादकीय तंत्रज्ञान यामुळे अनेक लोक सतत शेअर मार्केटलाच चिकटून राहिल्याचे दृष्य अनेक ठिकाणी पहायला मिळते. आर्थिक बाजारात घडणा-या घटनांनी दैनंदिन आणि कौटुंबिक विस्कळीत झाल्याचे दिसते. याचा अर्थ पैसा मिळवू नये का? आपल्या क्षमता वापरु नयेत का? असा प्रश्न पडेल. पैसा नक्कीच कमाविला पाहिजे पण तो "किती आणि कसा’ हा कळीचा मुद्दा आहे. जीवनासाठी पैसा का पैशांसाठी जीवन इथे खरी मेख आहे. पैसा आणि इतर संसाधने आपल्या सुखासाठी गोळा करताना माणूस खरच सुखी झाला आहे का, हा जीवघेणा प्रश्न संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. प्रचंड पैसा मिळवून मग तो वैद्यकीय खर्चासाठी घालवण्याची उदाहरणे कमी नाहीत. खरतर आपल्याकडे येणारा पैसा तणावासहित आहे की तणावारहित आहे हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. "श्री सूक्तां"मध्ये लक्ष्मीची छान व्याख्या केली आहे. आपल्याला हत्तीवर बसून येणारी लक्ष्मी हवी का कुत्र्यावर बसून येणारी लक्ष्मी हवी आहे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. हत्तीवरील लक्ष्मी आपल्याकडे येताना सुख, शांती आणि समाधान बरोबरीने आणेल. कुत्र्यावरुन येणारी लक्ष्मी आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाचे आणि आयुष्याचे लचके तोडेल. कुणालाही न दु:खवता, कोणालाही न ओरबाडता आणि कोणतेही शिव्या शाप बरोबर नसलेला पैसा हाच सुखकारक पैसा असतो. त्यातून कोणत्याही ताण तणावांची निर्मिती होत नाही. त्याचा आपल्याला निर्भेळ आनंद उपभोगता येतो.
आपण आपले कौशल्य, क्षमता आणि सामर्थ्य यांचा पुरेपूर उपयोग करुन संपत्ती निर्माण करतो. कदाचित संपत्ती कमविणे आणि निर्माण करणे आजच्या काळात सोपे झाले आहे. मात्र ती संरक्षित करुन राखणे आणि तिचे संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. याला अनेक कारणे आहेत. चंगळवादी जीवनशैली आणि न संपणारी हाव हे याचे मुख्य कारण आहे. एक उदाहरण घेवू एक छोटा दुकानदार होता. त्याचे बाजारात छोटेसे कटालरी आणि स्टेशनरी मालाचे दुकान होते. महिन्याची मिळकत २५ ते ३० हजाराची होती. चांगले चालले होते. कुठेतरी वाचून झटपट पैसे मिळवण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मार्केट मध्ये पैसे गुंतवू लागला. पहिल्या टिप्सवर चांगला फायदा मिळाला. जणूकाही त्याची चटक लागली आणि त्यानंतर पुढच्या २ ते ३ वर्षात सर्व काही घालवून बसला कष्टरहित पैशाच्या लोभाने आपले चांगले चाललेले दुकान गमवायची पाळी त्याच्यावर आली. असेच एक दुसरे उदाहरण, एका डॉक्टरचे. चांगली प्रॅक्टीस होती. महिन्याकाठी ५० ते ६० हजार मिळायचे. त्याने मल्टी लेवल मार्केटिंग सुरु केले. डॉक्टर या पदाचा वापर करुन नेटवर्क तयार केले. शेवटी प्रॅक्टीस थांबली आणि नेटवर्कींग मध्ये कर्जबाजारी व्हायची वेळ आली. अब्राहम लिंकनची कविता प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की "घाम गाळून कमावलेल्या एकच छ्दाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो."
गुंतवणूक करताना आपण मोठी मुदत, मध्यम मुदत आणि लघु मुदत असे ध्येय निश्चित केले पाहिजे. जर आपल्याला शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यातील काही नक्की कळत असेल तरच त्यात गुंतवणूक करावी. अन्यथा त्या वाटेला जावू नये हेच खरे. कितीही जागतिक दाखले दिले आणि क्लिष्ट आकडेवारी आकर्षक करुन मांडली तरी वस्तुस्थिती अशी आहे की शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, युलिप यातील गुंतवणूकींनी छोट्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नेहमी दगा दिला आहे. पाळलेल्या अर्थतज्ञांनी कितीही कोलाहल केला तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शहाण्या माणसाने अधिकाधिक गुंतवणूक सुरक्षित ठिकाणी करावी. पोष्ट ऑफिस, सरकारी रोखे, बॅंका, अत्यंत प्रतिष्ठीत कंपन्या या परीघाबाहेर सहसा पडू नये. माझा पैसा कष्टाचा आहे, तो मी जुगारात पणाला लावणार नाही असा निश्चय करावा. दोन पैसे कमी व्याज, कमी उत्पन्न मिळाले तरी चालेल पण अधिकाच्या हावेने माझी मूळ गुंतवणूकीत धोक्यात आणणार नाही, याची काळजी घ्यावी. गुंतवणूक शास्त्र म्हणजे तुमच्या पैशाने आपोआप पैसा मिळवणे किंवा तुमचा राखलेला पैसा आपोआप वाढणे याचे शास्त्र. मात्र हे करताना तुमच्या पैशावर कायदेशीर मार्गांनी डल्ला मारायला अनेक जण टपून बसलेले आहेत याचा विसर पडू देता कामा नये. ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, संपता संपत नाही अशांनी आणि ज्यांचा पूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास आहे अशांनी जोखिमपूर्ण गुंतवणूक करायला हरकत नाही. पोष्ट, सरकारी गुंतवणूकी बरोबरच सोन्यामध्ये योग्य त्या प्रमाणात गुंतवणूक करायला हवी. त्याचबरोबर सरकारी कंपन्यांकडून आयुर्विमा (यातही टर्म इंश्युरन्स), मेडिक्लेम काढायला हवा. तसेच जमिनीमध्ये विशेषत: प्लॉटमध्ये गुंतवणूक करायला हवी. दीर्घ मुदतीत जमीनीतील गुंतवणूक चांगला परतावा देते असा अनेकांचा अनुभव आहे.
तणावरहित गुंतवणूक ही प्रत्येक व्यक्तीसाठी आज एक आव्हान बनून राहिली आहे. अधिकीचा पैसा अनेकदा अधिकीची जोखिम बरोबर आणतो. आपल्या जीवनाला आवश्यक तेवढेच आपल्या जवळ राखणे शहाणपणाचे आहे. स्वत:साठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी आवश्यक तेवढी गुंतवणूक नक्की करावी. मात्र उगीचच पुढच्या सात पिढ्यांची काळजी करत पैसे गोळा करत बसू नये. कमवलेल्या संपत्तीचा आपल्या आयुष्यात व्यवस्थितपणे उपभोग घेता आला पाहिजे, याप्रमाणे गुंतवणूकीचे नियोजन करावे. आयुष्याच्या विविध टप्यांवर असणा-या गरजांचा वेध घेवून त्याप्रमाणे फायनानशियल प्लॅनिंग आणि त्याच बरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग करावे. शेवटी तणावरहित गुंतवणूक हाच तणावरहित, आनंददायी जीवनाचा पाया आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
Comments