top of page
  • Writer's pictureProf. Kshitij Patukale

आर्थिक नियोजनातील खर्च कोणते ?


आर्थिक नियोजनात सर्वात महत्त्वाचे खर्च नियोजित करता येतात ते म्हणजे नैमित्तिक खर्च. काही खर्च हे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात ठराविक वेळी करावेच लागतात. कौटुंबिक गरजा, सामाजिक गरजा, पिढीजात परंपरा, जन्म-मृत्यु इत्यादी प्रसंगाच्या वेळी हे खर्च करावे लागतात. त्यासाठी आधीपासून जुळणी करून ठेवता येते. त्यांचे वेळीच नियोजन केले असता ऎनवेळी पैशाची अडचण येत नाही.


१) आपल्या पालकांचा सांभाळ : आपले आई-वडील आपल्याबरोबर राहत असतील, किंवा स्वतंत्र राहत असतील, तर त्यांचा मासिक खर्च, आजारपण, तीर्थयात्रा, त्यांचे वैयक्तिक खर्च, इत्यादी, आपल्याला करावे लागतात. बहुधा आई-वडिलांनी पेन्शन किंवा नियमित उत्पन्नाची सोय केलेली असते. तरीही काही ना काही खर्च येतच असतो. त्याचे आधीच नियोजन करून ठेवता येते.


२) मुलांचे शिक्षण : आपल्या मुलांचे शिक्षण भरपूर व्हावे, त्यांना सर्व प्रकारच्या संधी, सोयी, सवलती मिळाव्यात, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मुलांनी सुस्थापित व्हावे आणि म्हातारपणी आपला सांभाळ करावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च ही एका गुंतवणूकच असते. आज शिक्षणाचा खर्च बेसुमार वाढत आहे. सरकारनेही अनुदानाचा हात आखडता घेतला आहे. मुलांच्या शिकवण्या, कॉलेजची फी, पुस्तके, वह्या, गाईड, इतर खर्च सतत वाढत आहेत. मुलांछ्या वाढत्या वयाबरोबर हे खर्च वाढत जातात. त्यांचा अंदाज घेऊन आधीच नियोजन करणे शक्य आहे.


३) स्वत:चे घर : स्वत:चे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. एक चांगला बंगला असावा, असे म्हणतात. ते घरसुद्धा वेळीच होणे आवश्यक असते. त्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक आहे. घर बांधताना बजेट विस्कळीत होते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. घरासाठी वेळोवेळी पैसा साठविणे, योग्य मार्गाने, कमीत कमी व्याजदरात कर्ज मिळविणे, त्याची फेड वेळेत होईल याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.


४) स्वत:चे वाहन : घर झालं, आता गाडी हवी ! आपापली गरज, ऎपत, उत्पन्न, प्रतिष्ठा पाहून वाहन घेणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. अत्यंत गतिमान, धावत्या जगात, जेथे वेळेला फार किंमत आहे, तेथे वाहन ही चैनीची वस्तू नसून आवश्यक बाब बनली आहे. त्यासाठी पैशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.


५) मुलामुलींचे विवाह : सर्वाधिक चिंतेचा आणि खर्चाचा विषय म्हणजे विवाह. मुलगी जन्माला आल्यावर पहिल्या दिवसापासून तिच्या लग्नासाठी पैसा साठविणारे लोक आपण पाहतो. तथाकथित सामाजिक रूढी, परंपरा, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना यामुळे विवाह हा एक फार मोठा खर्चाचा विषय झाला आहे. त्यासाठी खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे.


६) स्वत:च्या निवृत्तीनंतरची व्यवस्था : आपल्या स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे. विशेषत: आजच्या अत्यंत अस्थिर आर्थिक वातावरणात तर याचे महत्त्व फार वाढले आहे. एका बाजूला सतत वाढणारी महागाई आणि दुसऱ्या बाजूला सतत कमी होणारे व्याजदर यांच्या विळख्यात आजचा गुंतवणूकदार आहे. निवृत्तीनंतर आपल्याला मासिक उत्पन्न मिळावे म्हणून आवश्यक तेवढी तरतूद करून ठेवणे आवश्यक आहे.


आता आपण तातडीचे व आणीबाणीने खर्च कोणते ते पाहू या.

आपण कधी ऐनवेळी तातडीने लागणाऱ्या आर्थिक गरजेचा विचार करतो का ? अनेकदा आयुष्यात असे घडते, की अकस्मात, ध्यानीमनी नसताना एखादी घटना घडते, त्यावेळी अचानक छोट्या-मोठ्या रकमेची गरज लागते. उदा. अचानक येणारे आजारपण, एखादे ऑपरेशन, छोटा-मोठा अपघात, मुलांचे धडपडणे, मुलांची अ‍ॅडमिशन, शाळांच्या सहली, अचानक घरी आलेले पाहुणे, जवळच्यांचा, नातलगांचा विवाह, वास्तुशांत, घरच्यांपैकी कुणाचा तरी अकस्मात मृत्यु, तीर्थयात्रा इ. अनेक वेळी आपल्याला पैशांची गरज लागते. कर्ज काढावे लागते. उसनवारी करावी लागते. पैशांसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागतात. अत्यंत जिकिरीची व दयनीय अवस्था होते. अनेक प्रकारच्या अकस्मात उद्भवणाऱ्या खर्चाला तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवणे शहाणपणाचे. साधारणपणे आपल्या मासिक उत्पन्नाच्या ६ पट एवढी रक़्कम तातडीच्या खर्चासाठी काढून ठेवावी. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार आपल्या गरजांनुसार ही रक़्कम ठरवावी. ठरवलेली रक़्कम सतत आपल्याजवळ रोख किंवा लगेच रोखीत रुपांतर करता येण्याजोगी अशा स्वरुपात ठेवावी. महत्त्वाची म्हणजे ही रक़्कम गंगाजळी आहे, हे लक्षात ठेवावे. यातील पैसा खर्च केल्यानंतर पुन्हा शक्य तेवढ्या लवकर जेवढी रक़्कम काढली तेवढ्या रकमेची भर त्या गंगाजाळीत करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शिल्लक काहीच राहणार नाही, व तातडीच्या आर्थिक नियोजनाचा मूळ उद्देशच संपुष्टात येईल.

"

657 views0 comments

Comments


bottom of page